Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तासगावात द्राक्ष व्यापाऱ्याला लुटणाऱ्या तिघांना अटक..

तासगावात द्राक्ष व्यापाऱ्याला लुटणाऱ्या तिघांना अटक..


सांगली :  तासगावमध्ये सांगली रस्त्यावरील गणेश कॉलनी येथे द्राक्ष व्यापाऱ्याला धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्याच्याकडील एक कोटी 10 लाखांची रोकड लुटण्यात आली होती. या घटनेनंतर अवघ्या काही तासात यातील तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 1 कोटी 9 लाख रुपये, एक दुचाकी, एक तलवार असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली. नितीन खंडू यलमार (वय 23), विकास मारुती पाटील (वय 32), अजित राजेंद्र पाटील (वय 22, सर्व रा. मतकुणकी, ता. तासगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महेश शितलदास केवलानी (रा. नाशिक) यांनी तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. केवलानी द्राक्ष व्यापारी आहेत. गेल्या चार ते पाच वर्षांपासून ते तासगाव येथे येऊन द्राक्षे खरेदी करत आहेत. यंदाही ते खरेदीसाठी तासगावमध्ये आले आहेत.

केवलानी यांनी तासगाव-सांगली रस्त्यावरील गणेश कॉलनी येथे एक बंगला भाड्याने घेतला आहे. मंगळवारी ते व्यवहाराचे पैसे आणण्यासाठी चालक आणि दिवाणजी यांच्यासोबत स्कॉर्पिओमधून (एमच 15 जीएफ 0215) सांगलीला गेले होते. रात्री सव्वासातच्या सुमारास ते तासगावमध्ये परतत होते. त्यावेळी गणेश कॉलनी परिसरातील रस्त्यावरील दिवे बंद होते. अंधाराचा फायदा घेत संशयित दुचाकीवरून आले. संशयितांनी त्यांच्या स्कॉर्पिओच्या आडवी गाडी उभी केली. त्यातील एकाने चालकाला धारदार शस्त्राचा धाक दाखविला. अन्य संशयितांनी केवलानी आणि त्यांचे दिवाणजी यांना धमकावत कारमधून बाहेर काढले. त्यानंतर संशयितांनी गाडीतील पैशांची बॅग हिसकावून घेतली. नंतर ते दुचाकीवरून पसार झाले.


ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. पोलिस अधीक्षक डॉ. तेली यांनी यातील गुन्हेगारांना पकडण्याचे आदेश एलसीबीला दिले होते. त्यानंतर एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांचे एक विशेष पथक तयार केले.  पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. त्यावेळी ही लूटमार मतकुणकी येथील तरुणांनी केल्याची माहिती खबऱयाद्वारे मिळाली. त्यानंतर पथकाने सापळा रचून मनेराजुरी येथील शिकोबा डोंगराच्या पायथ्याशी निर्जनस्थळी थांबलेल्या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचे 1 कोटी 9 लाख रुपये, एक दुचाकी, एक तलवार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, तासगावचे निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप शिंदे, प्रशांत निशानदार, सागर टिंगरे, मच्छिंद्र बर्डे, संदीप पाटील, संतोष गळवे, विक्रम खोत, चेतन महाजन, प्रशांत माळी, सचिन कनप आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

अजित पाटीलचे होते येणे जाणे

यातील संशयित अजित पाटील एका टेम्पोवर चालक असल्याने द्राक्षे ने आण करण्यासाठी त्याचे केवलानी यांच्याकडे येणे जाणे होते. शिवाय हिवरे येथील तिहेरी हत्याकांडात तो संशयित होता. त्यामुळे त्यानेच केवलानी यांच्याकडील पैशांची टीप देऊन ही चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.

गुन्ह्यात वापरलेली दुचाकी चोरीची

या गुन्ह्यात संशयितांनी वापरलेली दुचाकी चोरीची असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. नितीन यलमार याने ती दुचाकी किल्ले मच्छिन्द्रगड येथून चोरल्याची कबुली दिली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.