Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोरोनानंतर आता नवे संकट!

कोरोनानंतर आता नवे संकट!


गेल्या दोन महिन्यांपासून देशभरात 'इन्फ्लुएन्झा ए' या विषाणूचा उपप्रकार असलेल्या 'एच३एन२'चा झपाट्याने प्रादुर्भाव वाढत आहे. परिणामी खोकला आणि ताप यांचे प्रमाण वाढीस लागले आहे. या विषाणूची बाधा होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्याचे निर्देश भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) दिले आहेत. घराघरांत खोकल्याची लागण झाल्याचे चित्र सध्या आहे.

आयसीएमआरचे वैज्ञानिक श्वसनाशी संबंधित उद्भवणाऱ्या या आजाराकडे विविध विषाणू संशोधन प्रयोगशाळा माध्यमांतून लक्ष ठेवून आहेत. तसेच या विषाणूच्या संसर्गात अँटिबायोटिकचा अतिरेक करू नये. रुग्णाची तपासणी करून गरज असेल तरच त्याचा वापर करावा, अशा सूचना इंडियन मेडिकल असोसिएशनने केल्या आहेत. गेल्या काही महिन्यांत मुंबईसह राज्यात नागरिकांना मोठ्या प्रमाणात खोकला येत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या उद्रेकानंतर अशा पद्धतीच्या रुग्णांत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

काय आहे नेमका हा प्रकार?

सर्वसाधारणपणे थंडी आणि पावसाळ्यात इन्फ्लुएंझा आढळून येत असतो. या इन्फ्लुएंझा विषाणूचे ए, बी, सी असे तीन प्रकार आहेत. त्यांपैकी 'इन्फ्लुएंझा ए' या विषाणूच्या प्रकारामुळे खोकला आणि ताप येत असतो. हा एका विशिष्ट हंगामात दिसणारा विषाणू आहे. या आजाराला घाबरण्याची गरज नसली तरी डॉक्टरांचा सल्ला वेळेत घेणे गरजेचे आहे.

खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. मात्र विषाणूंसोबत वातावरणात प्रदूषण असल्याने त्याचा परिणामही दिसून येत आहे. हा हवेतून पसरणारा विषाणू आहे. त्यामुळे मास्क घाला. तसेच रोगप्रतिकारकी शक्ती चांगली राहण्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचा वापर आहारात करावा. घरी आल्यावर कोमट पाण्याच्या गुळण्या कराव्यात. त्यात थोडे मीठ टाकावे. आता उन्हाळा सुरू झाला असून पाणी जास्त प्रमाणात ठेवावे. लहान मुलांना ताप-खोकला येत असल्यास शाळेत पाठवू नये. या खोकल्याचा संसर्ग होण्याची शक्यता असते, त्यामुळे कोरोनाकाळात ती काळजी घेतली ती घ्यावी.

डॉ. श्रीनिवास चव्हाण, कान, नाक, घसा विभागप्रमुख, सर जे. जे. रुग्णालय.

आयसीएमआरने काय सांगितले?

साबणाने नियमित हात धुवून घ्या. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या आजाराचे लक्षणे आढळली तर मास्क वापरा. खोकताना तसेच शिंकताना नाक आणि तोंडावर रुमाल धरा. द्रवरूप पदार्थांचे मोठ्या प्रमाणात सेवन करा. ताप तसेच अंगदुखीचा त्रास होत असेल तर पॅरासिटामॉल घ्या. 'एच३ एन२' विषाणू 'इन्फ्लुएंझा ए'चा उपप्रकार नवीन नाही. सद्य:स्थितीत १० ते २० टक्के वातावरणात हा विषाणू पसरला आहे. सध्याचा हंगाम या विषाणूला पोषक असा आहे.

डॉ. नितीन आंबाडेकर, संचालक, आरोग्य विभाग

सध्या बहुतांश लोकांना ताप, सर्दी, घसादुखी, अंगदुखी आदी त्रास होत आहेत. हे सर्व इन्फ्ल्युएंझामुळे होत आहे. या आजारांमध्ये रुग्णाला अँटिबायोटिक्स अजिबात देऊ नका.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.