मीडिया ट्रायलमुळे व्यक्ती 'दोषी' ठरवली जाते, सरन्यायाधीशांची टीका
मीडिया ट्रायल हा जबाबदार पत्रकारितेसाठी एक मोठा धोका असून त्यामुळे न्यायालयाआधीच एखादी व्यक्ती दोषी ठरवली जाते, असं मत सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांनी व्यक्त केलं आहे. 16व्या रामनाथ गोएंका पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
या सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून बोलताना त्यांनी पत्रकारितेच्या बदलत्या आयामांना अधोरेखित केलं. ते म्हणाले की, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली पत्रकारिता हा सत्याचा दीपस्तंभ आहे, जो आपल्याला उज्ज्वल भविष्याचा मार्ग दाखवेल. पण, बदलत्या तंत्रज्ञानाचा परिणामही या सगळ्यावर होत आहे. त्यातला एक प्रमुख धोका म्हणजे मीडिया ट्रायल हा आहे. एखाद्या मुद्द्यावर किंवा घटनेवर उहापोह करताना संबंधित घटनांमध्ये सहभागी असलेल्यांना आरोपी मानून त्यांच्यावर मीडिया ट्रायल केली जाते. यामुळे अनेक गंभीर प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्ती आधीच जनतेच्या नजरेत दोषी ठरते, असं स्पष्ट मत चंद्रचूड यांनी व्यक्त केलं.
मीडिया ट्रायल हा आपल्या व्यवस्थेसाठी एक मोठा धोका आहे. कारण, एखादी व्यक्ती तोपर्यंत निर्दोषच असते, जोपर्यंत तिला न्यायालय दोषी मानत नाही. न्यायप्रक्रियेचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. पण, मीडिया ट्रायलमुळे एखादी व्यक्ती न्यायालयीन प्रकियेचा भाग न होता आधीच दोषी ठरवली जाते, तेव्हा त्या व्यक्तिच्या जीवनावर आणि न्यायप्रक्रियेवर देखील गंभीर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. जबाबदार पत्रकारिता एखाद्या रेल्वे इंजिनाप्रमाणे आहे. ती सत्य, न्याय आणि समानतेवर आधारित लोकशाहीरूपी रेल्वेला योग्य मार्गाने पुढे घेऊन जाईल. सध्या सगळं जग डीजिटल काळातून प्रवास करत आहे. त्याची स्वतंत्र आव्हानं आहेत. अशा परिस्थितीत पत्रकारांनी आपल्या कामातील अधिक अचूकता, निष्पक्षपातीपणा आणि जबाबदारी यांची जाणीव जिवंत ठेवावी, असं आवाहनही सरन्यायाधीशांनी केलं.
'माध्यमांच्या जगात असं न्यूजरूम असायला हवं, जिथे विविध दृष्टिकोन आणि प्रतिनिधित्वांसह योग्य आणि खऱ्या बातम्यांच्या चर्चा होतील. पत्रकारांनी न्यायालयीन निवाडे, न्यायाधीशांच्या टिप्पण्या आणि निर्णय यांचे सोयीचे अर्थ लावणे, हा अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. महत्त्वपूर्ण कायदेशीर विषयांमध्ये जनतेच्या आकलनक्षमतेला विचलित करण्याचा हा एक प्रकार' असल्याची टीकाही चंद्रचूड यांनी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.