भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य; राहुल गांधी...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविषयी एका भाजप नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राहुल गांधी हे मूल जन्माला घालू शकत नसल्याने ते अद्याप अविवाहित आहेत, असं वक्तव्य भाजप नेते नलिन कुमार कतिल यांनी केलं आहे. कतिल हे कर्नाटक भाजपचे अध्यक्ष आहेत. सोमवारी भाजपच्या विजय संकल्प यात्रेतील सभेदरम्यान कतिल यांनी भाषण केलं. या भाषणात ते म्हणाले की, राहुल गांधी आणि सिद्धारमैया यांनी लोकांना कोरोना लस न घेण्याच आवाहन केलं होतं. जे लस टोचून घेतील त्यांना मुलं होणार नाहीत, असंही सांगितलं. पण, त्या दोघांनी ती लस टोचून घेतली, असं कतिल यावेळी म्हणाले.
राहुल गांधी यांच्यावर टीका करताना कतिल यांची जीभ घसरली. राहुल गांधी हे मूल जन्माला घालू शकत नसल्याने त्यांना लग्न करण्यात कोणतंही स्वारस्य नसल्याचं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं. आपला हा दावा सिद्ध करण्यासाठी त्यांनी कर्नाटकचे विधान परिषदेचे आमदार मंजुनाथ यांचा हवाला दिला. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर भाजप नेत्यांकडून सातत्याने टीका केली जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राहुल गांधी यांनी अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी काही प्रश्न उपस्थित केले होते. लंडन दौऱ्यावर असतानाही त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठात भाषण केलं. त्यानंतर भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.