खासदार राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा
सुरत दि २३ : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना मोदी आडनावावरून केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल दाखल झालेल्या गुन्ह्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुरत जिल्हा न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत हा निर्णय दिला आहे.
कर्नाटकातील एका सभेत केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सूरत येथे गुन्हा दाखल झाला होता या सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता. २०१९च्या निवडणुकी वेळी राहुल गांधी यांनी मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. सगळ्या चोरांचं नाव हे मोदीच का असतं?, असं राहुल गांधी म्हणाले होते. या प्रकरणी भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दिली होती. याप्रकरणी सूरतच्या कोर्टात गुन्हा दाखल झाला होता. कोर्टाने त्यांना दोषी ठरवत दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. चार वर्षांनंतर सुरत सत्र न्यायालयाने आज निकाल दिला आहे. राहुल गांधी यांना भारतीय दंड संहिता कलम ५०४ अन्वये दोषी ठरवण्यात आले आहे. या कलमाखाली जास्तीत जास्त दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते किंवा दंड आणि दोन वर्षांची शिक्षा असे दोन्ही होऊ शकते. दरम्यान या निकालाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी कोर्टात प्रत्यक्ष हजर होते. या निर्णयानंतर राहुल गांधी यांची खासदारकी धोक्यात आली आहे. ही शिक्षा कायम राहिल्यास त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी यांच्याकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. यावर ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान राहुल गांधींची प्रतिमा मलिन करण्याचा मोदी सरकारचा हा डाव आहे, या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते राज्यभर जेलभर आंदोलन करणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांना सांगितले. यामुळे वातावरण तापले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.