Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'आळंदी-देहूत आल्यावर मानसिक समाधान मिळतं' शरद पवारांनी घेतले तुकोबांचे दर्शन

'आळंदी-देहूत आल्यावर मानसिक समाधान मिळतं' शरद पवारांनी घेतले तुकोबांचे दर्शन


राष्ट्रवादी काँग्रेसचे  संस्थापक अध्यक्ष, खासदार शरद पवार हे सोमवारी (दिनांक 6 मार्च) रोजी पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी श्री क्षेत्र देहू येथे जाऊन श्री संत तुकाराम महाराज यांचे मुख्य मंदिरात दर्शन घेतले. शरद पवार यांनी तब्बल 25 वर्षांनंतर देहूतील तुकोबांच्या मंदिरात जात दर्शन घेतले. यावेळी देहू संस्थानकडून तुकोबांची मूर्ती, पगडी आणि पुष्पगुच्छ देऊन शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला.

श्री संत तुकाराम महाराज यांच्या जीवनकार्यातील प्रसंगचित्रण यावर आधारित दिनदर्शिका अनावरण सोहळा देहूत पार पडला. या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार, मावळचे आमदार सुनिल शेळके आदी मान्यवर देखील उपस्थित होते. 'मी देव-दानव यांपासून लांब असतो, पण काही देवस्थान अशी आहेत, जी अंत:करणात आहेत, त्यापैकी एक म्हणजे शेगाव. आळंदी देहूत आल्यानंतर मानसिक समाधान मिळतं,' असे शरद पवार कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

'देहू येथील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या जीवनकार्यातील प्रसंगचित्रणावरील दिनदर्शिकेच्या अनावरण सोहळ्यास उपस्थित राहून आनंद वाटला. आळंदीचे आणि माऊलींचे स्मरण केले याचा मला मनापासून आनंद आहे. वर्षातील बारा महिने असतात त्यामध्ये वेगवेगळ्या बारा प्रसंगांवर तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित चित्र काढले आणि ते सर्व महाराष्ट्र व राज्याच्या बाहेर पर्यंत पोहोचवण्याचे कार्य शेगावमधील चित्रकार रुपेश मिस्त्री यांनी केले आहे. यानिमित्ताने जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे जीवन व त्यांचा संदेश घराघरात पोहचेल याचे समाधान आहे. आपणांस यशस्वी वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा. आपल्या हातून अशीच सेवा घडो ही सदिच्छा,' असेही पवार म्हणाले.


कार्यक्रमाला एमईपी इन्फ्रास्ट्रक्चरचे डायरेक्टर जयंत म्हैसकर, खेड विधानसभेचे आमदार दिलीप मोहिते, माजी आमदार उल्हास पवार, ज्येष्ठ नेते अंकुशराव काकडे, प्रकाश म्हस्के, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, माजी सरपंच अभिमन्यू काळोखे, कांतीलाल काळोखे, उपनगराध्यक्षा शितलताई हगवणे, संदीप आंद्रे, तसेच सन्माननीय विश्वस्त, नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.