जगद्गुरू चारूकीरती महाराज यांचे देहावसान
स्वस्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य चारुकिर्ती महास्वामीजी:देश - धर्म आणि आज पहाटे पाच वाजता देश-धर्म आणि संत रक्षक राष्ट्रसंत स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य चारुकिर्ती महास्वामीजींची सम्यक समाधी झाली. विंध्यगिरीचा विचारवंत संत.. जैन धर्म तत्वज्ञानाचा सातासमुद्रापार प्रचार आणि प्रसार करणारा चंद्रगिरीचा कलेकलेने वाढत पूर्ण झालेला धर्मचंद्र अनंतात विलीन झाला. वर्तमान श्रवणबेळगोळ तीर्थक्षेत्राचा कायापालट केलेला शिल्पकार.. अहिंसाप्रेमी भारताचा ज्ञानसूर्य अस्ताला गेला.भ.गोमटेश पावन भूमी श्रवणबेळगोळच्या सन १९६९ ते २०२३ या चारुकिर्ती युगाचा समारोप झाला त्यामुळे या मानवतावादी राष्ट्रसंत महामानवाला हृदयात साठवलेली लाखो माणसं पोरकी झाली. हा आघात फार मोठा आहे.
कर्नाटकातील वारंग येथे ३ मे १९४९ रोजी संन्यासपूर्व रत्नवर्मा नामक धर्मरत्नांचा जन्म हा भ. गोमटेशांच्या तपश्चर्येचा गौरव करण्यासाठीच झाला होता. ऐन उमेदीत वयाच्या २१ व्या वर्षी १२ डिसेंबर १९६९ रोजी दीक्षित होऊन मला संपत्ती नको.. राज्य नको.. ऐश्वर्य नको.. संसार नको या वैराग्य भावनेतून जिनवाणी मातेच्या सेवेला त्यांनी पूर्णवेळ वाहून घेतले. संन्यास घेतला आणि अवघ्या पाच महिन्यात १९ एप्रिल १९७० रोजी जगद्विख्यात भ. गोमटेश चरणी नतमस्तक होऊन श्रवणबेळगोळ पीठाधीश झाले. त्यांनी म्हैसूर विद्यापीठाची एम.ए.इतिहास व बेंगळुरू विद्यापीठाची तत्वज्ञानाची पदव्युत्तर पदवी उत्कृष्ट गुणांनी प्राप्त केली होती. महास्वामिजींनी क्षेत्राचा कारभार हाती घेतला त्यावेळी क्षेत्राचा केवळ एक हजार रुपये बँक बॅलन्स होता. आज कोट्यवधी रुपयांची धर्मसंपत्ती निर्माण करुन सलग ५२ वर्षाच्या प्रदीर्घ काळात महास्वामीजींनी श्रवणबेळगोळचा संपूर्ण कायापालट केला हे काम ऐतिहासिक स्वरुपाचे आहे. बालवाडी पासून पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या २० हून अधिक शिक्षण शाखा, हाॅस्पिटल, अभियांत्रिकी काॅलेज, समाज संस्था या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य हे आदर्श व प्रेरणादायी आहे. त्यांच्याकडून दीक्षित १० मठाधिपती आणि भट्टारक पिठांचा जिर्णोद्धार हे कार्य अलौकिक आहे.महास्वामीजींनी काय केलं यापेक्षा काय केलं नाही हे विचारणे अधिक संयुक्तिक ठरेल.१)पीठाधीश झाल्याबरोबर त्यांनी क्षेत्रावरील सर्व ४० जिनमंदिरातील पूजा व्यवस्था सुचारु केली. त्यागी निवास व्यवस्था आणि राजा श्रेयांस भवन निर्माण करुन मुनींसाठी चौका व्यवस्था केली आणि संतरक्षणाचे ऐतिहासिक कार्य केले. यात्री निवास आणि भोजन व्यवस्था करुन भाविकांना सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या . क्षेत्रावरील ४० जिनमंदिरांचा जिर्णोद्धार केला. आसपासच्या परिसरातील अनेक जिनमंदीर जीर्णोद्धार त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झाले. कोणतीही तोडफोड न करता व प्राचीन मंदिर शिल्पाला बाधा न आणता त्यांनी १०० वर्षापूर्वीच्या त्रिभुवन तिलक पार्श्वनाथ मंदिराचा केलेला जिर्णोद्धार डोळ्याचे पारणे फिटणारे देखणे लायक असेच आहे. फेब्रुवारी २०११ मध्ये क्षेत्रावरील रत्नत्रय जिनमंदीरात भगवंताच्या प्राचीन रत्नांच्या प्रतिमा विराजमान केल्या.सहस्त्रफणी पार्श्वनाथ जिन मंदीर विजापूर, समवशरण मंदीर नल्लूर , भ. आदिनाथ मंदीर मकुर्ल, भक्तामर मंदीर शालिग्राम, सहस्त्रकूट जिनालय व मायसंद्रा जिनमंदीर आर्सिकेरी अशा पाच मंदीर कमिटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जिनवाणी सेवा केली आहे.स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य ललितकिर्तीजी कारकल, पूज्य भुवनकिर्तीजी कनकगिरी , पूज्य भानुकिर्तीजी कबंदहळ्ळी, पूज्य धवलकिर्तीजी अर्हतगिरी, पूज्य चारुकिर्तीजी मुडबिद्री, पूज्य देवेंद्रकिर्तीजी हुमचा, पूज्य लक्ष्मीसेनजी नरसिंहराजपूर, पूज्य भट्टाकंलकजी सौंदामठ व क्षुल्लक सिध्दांतकिर्तीजी अरतिपूर यांना मठाधिपतींच्या दिक्षा देऊन भट्टारक पिठांचा जिर्णोद्धार केला. या मठांना त्यांनी कायम मार्गदर्शन करुन आशीर्वाद दिला आहे. बालब्रम्हचारी आगम इंद्र यांना दिक्षा दिली. बालब्रम्हचारी संस्कार केंद्र सुरु केले.१९८८ मध्ये इंग्लंड मधील लेस्टर शहरात भ. गोमटेशांच्या ७ फुटी प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झाली आहे. अमेरीका, इंग्लंड, अफ्रीका, बर्मा व थायलंड इ. देशाचा प्रवास करुन परदेशात जिनवाणी प्रचार व प्रसार करुन जगाचे लक्ष वेधून घेतले. आचार्यश्री विद्यानंद महाराजांचा कर्नाटक प्रवेश भक्तीपूर्वक घडवून आणला व यात्रेकरूंसाठी विद्यानंद धर्मशाळा सुरू केली. मुडबिद्री मठाचे उत्तराधिकारी निवडीची अवघड जबाबदारी पार पाडली. गोम्मटवाणी पाक्षिक चालू करुन धर्मजागृतीला उत्तेजना दिली.१९८० मध्ये श्री गोमटेश विद्यापीठ प्रशस्ती पुरस्कार योजना सुरू करुन अनेक मान्यवरांचा अनेक वर्षे गौरव केला.१९८१ मध्ये भ. गोमटेश महामस्तकाभिषेक सोहळा अभूतपूर्व भक्तीमय वातावरणात संपन्न करुन देश विदेशातील सुमारे १० लाख भाविक उपस्थितीचा उच्चांक गाठला.यावेळी दिल्ली येथील लालकिल्ल्यापासून जनमंगल कलश महायात्रा सुरु करुन देशभर विहार करत दिलेला राष्ट्रीय एकात्मता व अहिंसेचा संदेश ही स्वामीजींची फार मोठी कामगिरी आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हेलिकॉप्टरमधून भ. गोमटेश मूर्तीवर केलेली पुष्पवृष्टी आणि भारत सरकारने भ. गोमटेशांचे काढलेले टपाल तिकीट ही फार मोठी उपलब्धी आहे. महास्वामीजींची कर्तबगारी लक्षात घेऊन इंदिरा गांधी यांनी त्यांना कर्मयोगी उपाधी बहाल केली होती. १९९३,२००६ या वर्षी झालेल्या महामस्तकाभिषेक सोहळ्यात महास्वामीजींनी घेतलेल्या कष्टाचा गौरवपूर्ण उल्लेख करावाच लागतो. १९९३ च्या सोहळ्यानंतर त्यांनी प्राकृत संशोधन संस्था सुरु केली. पांडुलिपीतील ताडपत्रीवरील ग्रंथ संरक्षणाचे काम पूर्ण केले. २००६ च्या महामस्तकाभिषेकानंतर त्यांनी बाहुबली बाल चिकित्सालय सुरु केले. २०१८ च्या महामस्तकाभिषेकानंतर त्यांनी १०० बेडचे हाॅस्पिटल व प्राकृत विश्वविद्यालय सुरु करण्याचा संकल्प सोडला.१९९७ नंतर त्यांनी गाडीचा वापर कमी केला. २००१ पासून फोनवरुन बोलण्याचे टाळले. २००२ ते २००९ या काळात पदविहार करुन अनेक जैन विद्वानांकडून धवला, जयधवला, महाधवला या आगम ग्रंथांच्या ४० भागांचे कन्नड भाषांतर करवून संपादक म्हणून जबाबदारी पार पाडली व त्यापैकी २१ भाग प्रकाशितही केले. त्यामुळे जिनवाणी महात्म्य कर्नाटकातील प्रत्येक जैन घरा- घरात पोहचले. २०१७ मध्ये कर्नाटक सरकारने रु. १० लाख रोख व प्रशस्तीपत्र देऊन महावीर शांती पुरस्काराने त्यांना सन्मानित केले.२०१८ मध्ये आचार्यश्री वर्धमानसागरजी व ३०० मुनीगणांच्या पावनसान्निध्यात संपन्न झालेल्या महामस्तकाभिषेक सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती महामहिम रामनाथजी कोविंद यांची उपस्थिती आणि त्यांनी महास्वामीजींनी केलेल्या प्रचंड मोठ्या कार्याची केलेली प्रशंसा उल्लेखनीय व जैन समाजाला भूषणावह आहे. १९९३ च्या महामस्तकाभिषेकानंतर त्यांनी विंध्यगिरी व चंदरगिरी महाद्वार निर्माण केले. जैन साधू व साध्वी यांची सेवा चांगल्या प्रकारे करण्यासाठी त्यांनी त्यागी सेवा समिती स्थापन केली. अक्षर कलश योजनेतून प्राचीन जैन साहित्य प्रकाशित केले. औषधी वनस्पती आणि वृक्षांचे रोपण व संवर्धनासाठी प्राकृतवन निर्माण केले. २००६ च्या मस्तकाभिषेक सोहळा कालावधीत श्रवणबेळगोळच्या प्रत्येक घरात शौचालय योजना यशस्वीरीत्या राबवली.
श्रवणबेळगोळ व परिसरातील गोरगरीब, आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना गोमटेश जनकल्याण ट्रस्ट मार्फत मोफत फिरता दवाखाना उपलब्ध करून दिला.मोफत सर्वचिकित्सा, नेत्र व दंतचिकित्सा आरोग्य शिबीरे भरवून आरोग्य रक्षणाचे मानवतावादी कार्य केले. दिव्यांगाना व्हिलचेअर्स, कॅलिपर्स, जयपूर फूट वाटप केले. आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना शिलाई मशीन वाटप करुन त्यांना स्वावलंबी बनवले.त्यांनी विकलांग व मंदबुद्धी विद्यार्थी यांना दरमहा रु. ११००/-रुपये शिष्यवृत्ती योजना राबविली. महाराष्ट्र व कर्नाटकातील पूरग्रस्तांच्या मदतीला राशन, कपडे, औषधे या स्वरुपात व रोखीने लाखो रुपयांची मदत केली. सतत कार्यमग्न, मौन संत, शांत, सौम्य व कठोर धर्माचरणी व्यक्तीमत्व आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे महास्वामिजींचे जीवन हाच वाचनीय खुला ग्रंथ आहे. अनुशासन, कर्तव्यनिष्ठा, धर्म व समाजहिताचे दृढ संकल्प व पराकोटीची विनयशीलता या सद्गुणांमुळे जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांचे अनुयायी लाखोंच्या संख्येने आहेत.
मौन साधना, ध्यान, स्वाध्याय यामध्ये त्यांनी कधीच खंड पडू दिला नाही.धर्म, शिक्षण, आरोग्य व संस्कार याबाबत महास्वामीजींनी केलेले काम जैन समाज कधीही विसरणार नाही एवढे मात्र निश्चित..!!दि.६ एप्रिल, २०२०रोजी त्यांचा सुवर्ण महोत्सवी दिक्षा महोत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न झाला त्यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष मा. रावसाहेब पाटील दादा यांनी सपत्नीक त्यांना चांदीचा शांतीकलश देऊन सन्मानित केले होते, त्यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन मा. रावसाहेब पाटील अण्णा, सर्वश्री पा. पा. पाटील, शांतीनाथ नंदगावे, बाळासाहेब पाटील, पुष्पदंत दोडण्णावर, अभय करोले, तात्यासाहेब पाटील व महावीर सूजी उपस्थित होते. दक्षिण भारत जैन सभेला कायमस्वरूपी महास्वामीजींचा आशीर्वाद होता. सभेच्या मनात कायम महास्वामीजींच्या बद्दल सर्वोच्च आदरभाव राहिला आहे.सांगलीला महास्वामीजींनी भरभरुन आशीर्वाद दिले आहेत. मा. सुरेश पाटील यांच्या पुढाकाराने सांगलीत झालेल्या कल्पद्रुम आराधना महोत्सवात महास्वामिजींचे पावन सान्निध्य आणि मंगल प्रवचन यामुळे सांगलीकर कायम महास्वामिजींच्या भक्ती आराधनेत स्वतःला धन्य समजत.
पूज्य स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य चारुकिर्ती महास्वामीजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या आत्म्यास चिरशांती व सदगती लाभो अशी जिनचरणी प्रार्थना करतो. 🙏💐
प्रा. एन.डी.बिरनाळे
महामंत्री
दक्षिण भारत जैन सभा
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.