दोन महिला IPS अन् IAS अधिकाऱ्यांचा वाद चव्हाट्यावर..
कर्नाटकातील दोन सरकारी अधिकाऱ्यांमधील भांडण सध्या सोशल मीडियावर चव्हाट्यावर आले आहे. आयपीएस डी रूपा मौदगिल यांनी रविवारी सोशल मीडियावर आयएएस रोहिणी सिंधुरी यांचे काही फोटो शेअर केले. तसेच रुपा यांनी रोहिणी यांनी तीन पुरुष आयएएस अधिकाऱ्यांना त्यांचे खाजगी फोटो पाठवले असल्याचा आरोपही केला आहे.
आयपीएस अधिकारी डी रूपा मौदगिल यांनी आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप देखील केले. या आरोपांना उत्तर देत रोहिणी यांनी आयपीएस रुपा त्यांना बदनाम करण्याचा कट रचत असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणावर नाराजी व्यक्त करत या दोघांवर देखील कारवाईचा इशारा दिला आहे.
आयपीएस डी रूपा यांनी शनिवारी आयएएस रोहिणींवर भ्रष्टाचाराचे आरोप देखील केले होते. तसेच त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि मुख्य सचिव वंदिता शर्मा यांच्याकडेही तक्रार केली होती. यानंतर रूपा यांनी शनिवारी त्यांच्या फेसबुक पेजवर काही फोटो शेअर केले. यासोबत रुपा यांनी आरोप केला आहे की, सिंधुर यांनी त्यांचे 2021 आणि 2022 मधील खाजगी फोटो तीन IAS अधिकाऱ्यांना शेअर केले.
दरम्यान आयएएस रोहिणी सिंधुरी यांनी रविवारी हे आरोप फेटाळून लावले. त्या म्हणाल्या की, आयपीएस रूपा आयएएस अधिकाऱ्यांना बदनाम करण्याची मोहीम राबवत असून कारवाईची धमकी देत आहेत. रूपाने माझ्या व्हॉट्सअॅप स्टेटसवरून खाजगी फोटोचे स्क्रीनशॉट घेतले आणि फेसबुकवर शेअर केले.
त्यानी आरोप केला आहे की मी काही आयएएस अधिकाऱ्यांना खाजगी फोटो पाठवले आहेत, मग तुम्ही त्यांची नावे का उघड करत नाही, असेही त्या म्हणाल्या. मानसिक आजार ही एक मोठी समस्या आहे, जेव्हा मोठ्या पदावर असलेल्या अधिकाऱ्याला हा आजार होतो, तेव्हा त्याचे परिणाम धोकादायक असतात. त्यांना उपचाराची गरज आहे, असेही त्यांनी म्हटले.
कर्नाटकच्या गृहमंत्र्यांचा कारवाईचा इशारा
कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी याप्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत आपण पोलिसांशी चर्चा केली असून मुख्यमंत्र्यांनाही याची माहिती असल्याचे त्यांनी सांगितले. दोन अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर असे बोलणे योग्य नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
राज्यसभा खासदार लहारसिंग सिरोया यांनी दोघांची सोशल मीडिया खाती बंद करण्याचा सल्ला दिला आहे. डी रूपा या कर्नाटक हस्तशिल्प विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत. तर रोहिणी सिंधुरी या हिंदू धार्मिक संस्था आणि धर्मादाय एंडॉवमेंट विभागाच्या आयुक्त आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.