बंडखोर शिवसेना नेता लवकरच गौप्यस्फोट करणार
२००९ मध्ये मला कुणी पाडलं. मला कुणी आव्हान दिलं होतं? माझा पराभव होण्यासाठी मातोश्रीतल्या एका नेत्याने आदेश दिला होता, यासगळ्यांचा खुलासा मी लवकरच करणार आहे. माझ्या पुढच्या सभेत यासंदर्भातला गौप्यस्फोट करेन, अशी माहिती शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी दिली आहे. खेड येथे काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली. माझ्या राजकीय मुस्कटदाबीसाठी मातोश्रीतून प्रयत्न सुरु होते, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे. कोकणातील ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या मतदारसंघ गुहागर येथील 10 सरपंच आणि असंख्य कार्यकर्त्यांनी काल शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी रामदास कदम यांनी कोकणातील शिवसेनेवर भाष्य केलं. तर उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांनी कशा प्रकारे राजकारण केलं, यावरून जोरदार टीका केली.
काय म्हणाले रामदास कदम?
2009 मध्ये मातोश्रीतून मला पाडण्यासाठी कुणी आदेश दिला होता? मातोश्रीनेच मला पाडलं का? हे तुम्हाला लवकरच मी जाहीर सभेत बोलणार आहे. मातोश्रीतल्याच एका नेत्याने असा आदेश दिला होता… असं रामदास कदम म्हणाले.
…तर उद्धव ठाकरे मातोश्रीतून निघाले नसते!
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे वारंवार शिंदे गटाच्या आमदारांवर खोक्यांचे आरोप करत आहेत. त्यावरून रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले, ‘ उद्धवजींनी खोके-ओके काहीही बोलू दे. 40 आमदारांना विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर खोके दिले जात आहेत. त्यामुळे ते निवडून येणार आहेत. आज ते एकनाथ शिंदेंनी बंड केलं नसतं, हा बदल झाला नसता तर उद्धव ठाकरेंनी मातोश्री सोडली नसती. अजितदादांनी त्यांच्या माजी आमदारांना ताकद देणं थांबवलं नसतं. यातला एकही आमदार निवडून आला नसता.
अजितदादा एक दमडा देत नव्हते. राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला मोठा निधी देत होते. मात्र आता शिंदे गटातील सर्व आमदार निवडून येतील. त्यांना नाईलाजाने निर्णय घ्यावा लागला. नाही तर सर्वांची राजकीय आत्महत्या झाली असती. अजित दादांनी एककलमी कार्यक्रम चालू केला होता.
उद्धव यांना थेट प्रत्युत्तर देणार….
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलंय. खेड येथील त्यांची सभा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मी सभा घेणार आणि सर्व आरोपांना प्रत्युत्तर देणार, असं रामदास कदम म्हणालेत. उद्धवजी खेडला सभेला येणार आहेत. दुसऱ्या दिवशी त्याच मैदानावर उत्तरं देणार. सगळी उत्तरं देऊन टाकेन. मी कुणाचं उट्टं ठेवत नाही कधी.
शिंदे गटाच्या बाजूने निकाल लागणार…
शिवसेनेचा वाद सध्या निवडणूक आयोगासमोर सुरु आहे. तसेच शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेबद्दलचा वाद सुप्रीम कोर्टात सुरु आहे. यावरून रामदास कदम यांनी भाष्य केलंय. मागचे निर्णय पाहिले तर इंदिरा गांधींपासून, आतापर्यंत… ज्यांच्याकडे अधिक आमदार, खासदार त्यांच्या बाजूने निकाल लागले आहेत. त्यामुळे हा निकालही शिंदेंच्या बाजूने लागणार..
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.