राहुल गांधी यांचा सवाल; अदानी यांची संपत्ती वाढवण्यासाठी ईडी आणि सीबीआयचा वापर..
गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नेमके नाते काय, असा खणखणीत सवाल करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा तोफखाना आज लोकसभेत धडाडला. आठ वर्षांपूर्वी जगातील श्रीमंतांच्या यादीत 609व्या क्रमांकावर असलेले अदानी आता दुसऱया क्रमांकाचे श्रीमंत कसे काय बनले, अशी कोणती जादू 2014 नंतर झाली, अशा अनेक प्रश्नांचा भडीमार करत राहुल यांनी मोदी सरकारच्या अदनीधार्जिण्या धोरणाची चिरफाडच केली.
अदानी यांची संपत्ती वाढवण्यासाठी मोदी सरकारने केवळ सरकारी नियमच बदलले नाहीत, तर ईडी, सीबीआयचाही वापर केला, असा बेधडक आरोपही राहुल यांनी केला. भाजपच्या बाकांवरून प्रचंड गोंधळ सुरू होता. मात्र त्यातही राहुल यांनी धमाकेदार भाषण केले आणि सरकारच्या अदानीप्रेमाचा बुरखाच फाडला.
राहुल यांनी दोन पह्टो सभागृहात झळकवले. नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी हे एकत्र विमानातून प्रवास करतानाचा एक पह्टो आणि दुसरा पह्टो 'अदानी' असे लिहिलेल्या विमानातून मोदी उतरतानाचा पह्टो, असे पह्टो राहुल यांनी सभागृहात दाखवले. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी मात्र या पह्टोंना आक्षेप घेतला आणि अशी कृती करणे योग्य नाही, असे म्हटले.
इंगित काय? लाभार्थी कोण?
मोदींनी ऑस्ट्रेलियाचा दौरा केल्यानंतर स्टेट बँकेने अदानींना एक बिलीयन डॉलर्सचे कर्ज दिले. मोदी बांगलादेशच्या दौऱयावर गेल्यानंतर तेथील 1500 मेगावॅट वीजनिर्मितीचे काम अदानींना मिळाले. मोदी इस्रायलला जातात आणि नंतर अदानींना ड्रोन रिफिट करण्याचे पंत्राट मिळते. मोदींच्या या विदेश दौऱयाचे इंगित काय आणि त्याचे लाभार्थी अदानी कसे काय, असा सवालच राहुल यांनी केला.
मोदी, अदानी आणि विमान
सुरुवातीच्या काळात नरेंद्र मोदी अदानींच्या विमानातून विदेशात फिरत असत. नंतर असा काळ आला की अदानीच मोदींच्या विमानात बसून फिरायला लागले, असा सणसणीत टोला लगावत राहुल गांधी यांनी मोदी यांच्या विदेश दौऱयाबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मोदी यांनी अदानीसोबत किती वेळा विदेश दौरा केला? मोदी विदेश दौऱयावर असताना अदानी नंतर तेथे त्यांना भेटले, असे किती वेळा झाले? मोदींचा विदेश दौरा आटोपला की लगेचच अदानी तेथे पोहचले, असे किती वेळा झाले? मोदींच्या दौऱयानंतर अदानी तेथे पोहचले आणि त्या देशातील पंत्राट मिळवले, असे किती वेळा घडले? अशी प्रश्नांची सरबत्तीच राहुल यांनी केली.
देशभर फक्त 'अदानी'च
'भारत जोडो' यात्रेचा हवाला देत राहुल गांधी म्हणाले, देशभरात मी 4 हजार किलोमीटरपेक्षा अधिक रस्ता पार केला. तेव्हा मला सर्वत्र एकच नाव ऐकायला मिळाले - अदानी… अदानी आणि अदानी. केरळ, तामीळनाडू, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या राज्यांतील युवकांचे प्रश्न एकच आहेत. अदानी व्यापार करतात. ते अजून अयशस्वी कसे झाले नाहीत? प्रत्येक क्षेत्रात तेच कसे आणि ते यशस्वी होतातच कसे? पहिल्यांदा अदानी एक-दोन क्षेत्रांत व्यवसाय करायचे. आता ते आठ-दहा क्षेत्रांत आहेत. आम्हालाही असे यशस्वी व्हायचे आहे. मोदीजी आमच्यासाठी हे असे काही करतील का, असे युवा वर्गाचे प्रश्न आहेत, असे राहुल गांधी म्हणले.
शेल कंपनी कुणाची?
हिंडनबर्ग रिपोर्टचा हवाला देऊन राहुल म्हणाले, अदानी यांच्या विदेशात शेल कंपन्या असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. या कंपन्या हजारो कोटी रुपये कुणाला पाठवत आहेत. हे पैसे कोणाचे आहेत? अदानी हे उदात्त काम मोफत करत आहेत का? हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असल्याने मोदी सरकारने याची उत्तरे द्यावीत, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.
राज्यसभेत गोंधळ
लोकसभेत आज अदानीच्या मुद्दय़ावरून निर्माण झालेल्या पेचप्रसंगावर तोडगा निघत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू झाली. राज्यसभेत मात्र दुपारी दोनपर्यंत याच मुद्दय़ावरून कामकाज तहकूब झाले. दुपारनंतर राज्यसभेचेही कामकाज सुरळीतपणे सुरू झाले.
ये रिश्ता क्या कहलाता है!
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर आज लोकसभेत चर्चा सुरू झाली. या चर्चेत सहभागी होताना राहुल यांनी तब्बल पाऊण तास तडाखेबंद भाषण केले आणि मोदी व अदानी यांचे विमान प्रवासातील एकत्रित पह्टो झळकवत 'ये रिश्ता क्या कहलाता है' असा बोचरा सवाल भाजपला केला. भाजपच्या बाकावरून तेव्हा गोंधळाला सुरुवात झाली. 2014नंतर अदानी जगातील दुसऱया क्रमांकाचे श्रीमंत कसे बनले, कोणी 'जादू' केली, असा सवाल राहुल यांनी करताच कायदा मंत्री किरण रिजिजू उभे राहिले आणि उगाच आरोप करू नका. पुरावे द्या, अशी त्यांनी मागणी केली. त्यानंतर भाजप सदस्यांनी गोंधळ आणखीनच वाढवला.
सरकारने नियमच बदलले
मोदी सरकारने अदानींवर कृपा करण्यासाठी सरकारी नियमच बदलले, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला. विमानतळ देखभालीचे काम अनुभव नसलेल्या कंपनीला देऊ नये, असा सरकारी नियम होता. मोदी सरकारने मात्र हा नियम बदलला आणि अदानींच्या घशात सहा विमानतळ घातले. मुंबई विमानतळ जगातील सर्वात फायदेशीर मानला जातो. तो जीव्हीके या पंपनीकडे होता. मात्र मोदी सरकारने ईडी, सीबीआयचा वापर करून मुंबई विमानतळ अदानींना बहाल केला. परिणाम काय झाला, आज देशातील 24 टक्के हवाई वाहतूक अदानी यांच्या ताब्यात गेली आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
'अग्निवीर' योजना जबरदस्तीने लादली
राहुल यांनी 'अग्निवीर' योजनेवरून टीकेची झोड उठवली. 'भारत जोडो' यात्रेत मला तरुणांनी 'अग्निवीर' योजनेबद्दल नापसंती दर्शवली. तरुण मित्र सरकारवर नाराज आहेत, मात्र अजित डोभाल यांच्या सांगण्यावरून ही योजना तरुणांच्या माथी मारण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही राहुल यांनी सुनावले. ही योजना लष्करातून नाही, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि गृहमंत्रालयातून आल्याचे वरिष्ठ लष्करी अधिकाऱयांनी सांगितल्याचे राहुल म्हणाले.
पाच प्रश्न
1. अदानी यांच्या विदेशात शेल पंपन्या आहेत असे हिंडनबर्ग रिपोर्ट सांगतो. या पंपन्या कोणाच्या आहेत हे सरकारने सांगावे. शेल पंपन्यांतून येणारा पैसा कुणाचा आहे?
2. पंतप्रधान मोदी यांच्या विदेश दौऱयात गौतम अदानी किती वेळा त्यांच्यासोबत होते?
3. विदेश दौऱयात पंतप्रधान मोदी आणि अदानी यांची किती वेळा भेट झाली?
4. मोदी विदेश दौऱयाहून परतले की अदानी लगेच त्या देशात जातात असे किती वेळा घडले?
5. अदानी यांनी भाजपला किती पैसे दिले? इलेक्ट्रोरल बॉण्डमध्ये अदानी यांनी किती रक्कम दिली?
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.