Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अंत्यसंस्कारासाठी मृतदेह वेटिंगवर!

अंत्यसंस्कारासाठी मृतदेह वेटिंगवर!


नाशिक : कोरोनाकाळात मृतांची संख्या वाढल्याने बेड अपुरे पडून जमिनीवर अग्निसंस्कार करण्याची वेळ आली. कोरोना परिस्थिती निवळल्यानंतरदेखील अमरधाममध्ये बेडची संख्या अपुरी पडत आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत अंत्यसंस्कारासाठी दहा ते बारा तास वेटींगवर मृतांच्या कुटुंबीयांना राहावे लागले. त्यामुळे नाशिक व पंचवटी अमरधाममध्ये प्रत्येकी पाच बेड वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर पंचवटी, सिडको व नाशिकरोड मध्ये प्रत्येकी दोन विद्युतदाहिनी तयार केली जाणार आहे.

नाशिक शहराचा विस्तार होत असताना पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याची आवश्‍यकता आहे. रस्ते, पाणीपुरवठा योजना, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, विद्युत, आरोग्य व वैद्यकीय सेवा याकडे अधिक लक्ष दिले जाते. परंतु मागील वर्षाच्या दहा महिन्यात हिंदू स्मशानभूमीतील बेडची संख्या वाढविण्याची गरज असल्याची बाब प्रकर्षाने समोर आली. २०२१ ते मार्च २०२२ या वर्षात कोरोनाने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या अधिक होती.

हिंदू स्मशानभूमीत अग्नीदहन, विद्युत व गॅसदाहिनी मिळून तब्बल १३ हजार ७६४ मृतदेहांची नोंद झाली. त्यानंतर कोरोना परिस्थिती पूर्वपदावर आली. परंतु कोरोनापूर्वीच्या कालावधीतील सरासरीत मृत्युंमध्ये वाढ झाली. त्याचा परिणाम अंत्यसंस्कारासाठी बेड कमी पडण्यावर झाला. त्यामुळे महापालिकेने पंचवटी व नाशिक अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी बेड वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

२६ स्मशानभूमीत ९२ बेड

नाशिक महापालिका क्षेत्रात सिडको, पंचवटी, पूर्व, नाशिक रोड व सातपूर पाच विभागांमध्ये एकूण २६ हिंदू स्मशानभुमी (अमरधाम) असून त्यात एकूण ९२ बेड आहेत. यातील सिडको विभागात मोरवाडी (४), उंटवाडी (२), पाथर्डी (२), कामठवाडे (२), अंबड (२), दाढेगाव (२) असे एकूण चौदा बेड आहेत. पंचवटी विभागात गणेशवाडी (९), नांदूर २), मानूर (२), आडगाव (४), म्हसरुळ (३), मखमलबाद (४) असे एकूण २४ बेड. पूर्व विभागात टाळकुटेश्वर अमरधाम (१४), आगर टाकळी (२) असे एकूण १६ बेड असून, नाशिक रोड विभागात देवळालीगाव (६), विहीतगाव (३), चेहेडी (२), वडनेर दु. (२), पिंपळगाव (२), चाडेगाव (२), दसक व पंचक (९) असे एकूण २६ बेड, सातपूर विभागात स्वारबाबानगर (५), पिंपळगाव बहुला (२), गंगापूर गाव (३), आनंदवल्ली (२) असे एकूण १२ बेड आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.