शरद पवार यांचा मोदींना टोला
देशाची सत्ता, सेना आणि पोलिसांना हाताशी धरायचे आणि कोणी प्रश्न मांडले, विरोध केला की 'मैं अकेला लढेगा' असे म्हणणारे लढवय्ये देशाला नको आहेत, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी फेडरेशनच्या महाअधिवेशनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी राज्यसभेत भाषण करताना 'मैं अकेला लढ रहा हूं' असे म्हटले होते.
शरद पवार यांनी यावरून मोदींना चांगलेच सुनावले. पवार म्हणाले, पंतप्रधानांनी ऐंशी मिनिटे भाषण केले; पण त्या कष्टकऱयांच्या दृष्टीने काही केले पाहिजे, त्यासंदर्भात काही धोरणे स्वीकारली पाहिजेत याबाबत चकार शब्दही काढला नाही. जे कुणी विरोध करतील, प्रश्न मांडतील त्यांच्याशी संघर्ष करायला मी एकटा तयार आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. यावर भाष्य करू इच्छित नाही, पण असा लढवय्या देशाला नको आहे. सर्वसामान्य, कष्टकरी यांच्या हिताची जपणूक करणारे लढवय्ये हवे आहेत, असे पवार म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.