शिराळाचे वनक्षेत्रपाल सचिन जाधव निलंबित..
सांगली : कार्यालयाची परवानगी न घेता वारणा कालव्याच्या उप कार्यकारी अभियंत्यांची खोटी सही, बनावट शिक्के वापरल्याच्या कारणावरून शिराळा येथील वनक्षेत्रपाल सचिन शंकर जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे. सांगली वनविभागाचे उप वनसंरक्षक नीता कट्टे यांनी याबाबतचे आदेश सोमवारी दिले आहेत. जाधव यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे सुयोग औंधकर यांनी तक्रार केली होती.
वाळवा तालुक्यातील पोखरणी येथील जमीन सपाटीकरणाचे काम करायचे होते. त्या कामाला मान्यता देण्यासाठी जाधव वनक्षेत्रपाल जाधव यांनी वारणा कालव्याचे उप कार्यकारी अभियंता यांचे बनावट सही, शिक्का वापरून स्वतःच्या कार्यालयात मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला. आणि जमीन सपाटीकरण काम करून घेतले. याबाबत संभाजी ब्रिगेडचे सुयोग औंधकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शासनाकडे तक्रार दिली होती.
औंधकर यांच्या तक्रारीची दखल घेत वन विभागाने सांगली वनीकरणचे सहायक वन संरक्षक यांना प्राथमिक अहवाल देण्यास सांगितले होते. त्यानुसार त्या चौकशीत वारणा कालव्याचे उप कार्यकारी अभियंता यांनी या कामाचा कोणताही प्रस्ताव पाठवला नसल्याचे स्पष्ट झाले. शिवाय जाधव यांनीच ती कागदपत्रे बनावट सही, शिक्क्याने कार्यालयात पाठवल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर सोमवारी महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 अंतर्गत जाधव यांच्यावर शिस्तभंग कारवाई करून त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. सांगलीच्या उप वनसंरक्षक नीता कट्टे यांनी त्याचे आदेश पारित केले आहेत. दरम्यान निलंबित काळात जाधव यांना सांगलीच्या उप वनसंरक्षक कार्यालयात हजेरी लावण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.