दीड तासापेक्षा जास्त वेळ मोबाईल वापराल तर होऊ शकतात हे गंभीर आजार.
नवी दिल्ली : आजच्या काळात स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. स्मार्ट फोनशिवाय जीवन जगणे सध्या कठीण झाले आहे. फोनमुळे आपले जीवनही खूप सोपे झाले आहे. अनेक गरजांसाठी याचा वापर केला जात असला तरी स्मार्टफोनमुळे आरोग्याचेही खूप नुकसान होत आहे.
स्मार्टफोनच्या सततच्या वापरामुळे लोक अनेक गंभीर आजारांना बळी पडत आहेत. मोबाईल जास्त पाहील्याने एका महिलेला तिची दृष्टी गमवावी लागल्याची घटना नुकतीच घडली होती. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, दिवसभरात दीड तासांपेक्षा जास्त वेळ फोन वापरल्याने तुमची प्रकृती बिघडू शकते. त्यामुळे तुम्हालाही जर जास्त वेळ मोबाईलच्या स्क्रीनवर डोळे चिकटून राहायची सवय असेल तर आजच सावध व्हा . स्मार्टफोनमुळे शरीराचे कसे नुकसान होते आणि त्यामुळे कोणते आजार होऊ शकतात हे जाणून घेऊया.
डोळे कोरडे होण्याचा त्रास वाढला
वरिष्ठ डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, स्मार्ट फोनच्या अतीवापरामुळे लोकांना कोरड्या डोळ्यांची समस्या भेडसावत आहे. ही समस्या लहान मुलांमध्ये जास्त दिसून येते. फोनमधून बाहेर पडणारे निळे किरण हे आपल्या डोळ्यांना हानी पोहोचवतात. त्यामुळे डोळे दुखणे, डोळे लाल होणे अशा समस्या दिसू लागल्या आहेत. अनेक मुलांना तर डोकेदुखीचाही त्रास होत आहे. कोरोना साथीच्या आजारानंतर अशा प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. मात्र गेल्या काही महिन्यांत रुग्णांमध्ये घट झाली असली तरी डोळे कोरडे होण्याची समस्या अजूनही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. याचे एक महत्वाचे कारण म्हणजे स्मार्ट फोनच आहे.
हाडांमध्ये वेदना होणे
काही ऑर्थोपेडिक डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, सतत अनेक तास फोन वापरल्याने संधिवात होऊ शकतो. कारण लोक तासन्तास फोन हातात धरून राहतात. यामुळे मनगट आणि कोपर दुखावते. हे दुखणे कायम राहिल्यास संधिवात होण्याचा धोका असतो. फोनच्या अतीवापरामुळे लोकांच्या हाताला आणि कोपरात वेदना होत असल्याची अशी काही प्रकरणे देखील पहायला मिळत आहेत. ही समस्या प्रौढांमध्येच नव्हे तर लहान मुलांमध्येही दिसून येत आहे. त्यामुळेच लोकांना स्मार्टफोन वापरताना काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ फोन हातात ठेवू नये, असेही सांगितले जाते.
मानसिक आरोग्यावरही होतो परिणाम
विनाकारण स्मार्ट फोन वापरणे टाळा, असा सल्ला वरिष्ठ डॉक्टर देतात. टाईमपास करण्यासाठी लोक तासन्तास फोनचा वापर करतात, पण असे करू नये. दिवसातून दीड तासांपेक्षा जास्त फोन न वापरण्याचा प्रयत्न करा. असे न केल्याने मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. विशेषत: रात्री फोनचा वापर केल्यास मानसिक आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे चिंता, नैराश्य यासारख्या समस्यांचा धोका उद्भवतो.
झोपेचा पॅटर्न बिघडतो
फोनच्या वापरामुळे झोपेचा पॅटर्नही खराब होतो, असे काही वरिष्ठ डॉक्टरांनी नमूद केले. अनेक मुलांना झोप न येण्याची समस्या भेडसावत असते. रात्री फोन वापरल्याने झोपेचे तास कमी होतात, त्याचा आरोग्यावर थेट परिणाम होतो. कमी झोपेमुळे डोकेदुखी आणि पोट खराब होण्यासारख्या समस्याही उद्भवताना दिसतात. अशा परिस्थितीत, स्मार्ट फोन वापरताना ब्रेक घेणे देखील खूप महत्वाचे आहे. लोकांना दिवसातून दीड तासांपेक्षा जास्त वेळ स्मार्ट फोन न वापरण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. एखादे महत्त्वाचे काम करत असाल तरीही फोन वापरताना मध्येच ब्रेक घ्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.