तर शिवाजीराजे भामट्या बुवा-बायांच्या अंगात येतील !
छत्रपती संभाजी राजेंनी शिवाजी महाराजांची आरती करू नये असे आवाहन महाराष्ट्राला केले आहे. छत्रपती संभाजी राजांनी अतिशय योग्य आणि स्तुत्य भूमिका घेतली आहे. गेल्या अनेक वर्षापासून महाराजांच्या आरतीचे कारस्थान सुरू आहे. छत्रपती शिवरायांचे दैवतीकरण करत त्यांना संपवण्याचा घाट घातला जात आहे. शिवरायांच्या शत्रूंना जे काम शक्य झाले नाही ते काम करण्यासाठी काही स्वकीय औलादी टपून आहेत. त्यांच्या डोक्यातले जातीय किडे शिवरायांचा कोथळा काढण्यासाठी टपलेले आहेत. त्यांना शिवरायांना संपवता येईना म्हणूनच ते शिवरायांच्यावर जीवापाड प्रेम करणा-या भोळ्या-भाबड्या लोकांच्या शिवभक्तीचा गैरफायदा घेत आहेत. त्यांचा अजेंडा लोकांच्या मस्तकात घुसवू पाहत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिवरायांची मंदिरं उभारणे, त्यांची आरती सुरू करणे, त्यांना नैवेद्य दाखवणे असे प्रकार रूजवत आहेत. हे काम जाणिवपुर्वक करत आहेत.
जी मुलं, जे युवक शिवाजी महाराजांची आरती करतात त्यांचे अंत:करण स्वच्छ आहे. त्यांचे शिवरायांच्यावर निखळ प्रेम आहे. त्यांची शिवरायांच्यावर प्रचंड निष्ठा व प्रेम आहे. त्यांच्या प्रेमावर शंका घेणे योग्य नाही. पण त्यांच्या भाबड्या प्रेमाचा गैरफायदा उचलण्यासाठी टपलेल्या लोकांचे कारस्थान त्यांना लक्षात येत नाही हाच कळीचा मुद्दा आहे. त्यांच्या या प्रेमाचाच गैरफायदा घेण्यासाठी टपलेल्या प्रवृत्ती आपला छुपा अजेंडा या युवकांच्या डोक्यात पेरताना दिसत आहेत. हा अजेंडा पेरताना त्यांच्या ओठावर शिवरायांचे गोडवे असतात पण मनात मात्र शिवरायांच्या द्वेषाना भरलेला सुरा असतो. शिवभक्तीचे ढोंग रचत तोच सुरा शिवरायांच्या पाठीत मारण्याचे कारस्थान रचले जात आहे.
माजी खासदार छत्रपती संभाजी राजांच्या लक्षात हे कारस्थान आल्याचे दिसते आहे. त्यांनी अतिशय योग्य भूमिका घेत शिवरायांची आरती करू नका ! अशी भूमिका घेतली आहे. त्यांची ही भूमिका अतिशय योग्य व कौतुकास्पद आहे. त्यांनी घेतलेल्या भूमिकेसाठी त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. या बाबत भूमिका घेणे गरजेचे होते. २००७-८ सालापासून वज्रधारीतून आम्ही या बाबत प्रबोधन करतो आहोत पण कारस्थान रचणारे मोठ्या संख्येने आहेत. त्यांच्यामागे राजकीय, आर्थिक ताकद आहे. त्यांच्यावर इथल्या भोळ्या-भाबड्या शिवभक्तांचा प्रचंड विश्वास आहे. त्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत हे जातीयवादी लोक आपला अजेंडा राबवत आहेत. हा अजेंडा राबवणा-या लोकांचा कावा ओळखावा इतका हा भाबडा शिवभक्त अजून जागा झालेला नाही. त्याचाच गैरफायदा घेवून कारस्थानामागे कारस्थानं रचली जात आहेत. शिवरायांना व त्यांच्या चरित्राला बदनाम केले जात आहे, वादग्रस्त केले जात आहे.
छत्रपती शिवरायांचे अखंड चरित्र प्रचंड पराक्रमाने व अतुलनिय शौर्याने भरलेले आहे. त्यांचा संघर्ष, त्यांचा लढा अभ्यासला तर विश्वास बसणार नाही असे अनेक प्रसंग आहेत. चमत्कार वाटावेत असे अनेक प्रसंग शिवचरित्रात आहेत. त्यांनी केलेल्या लढायांचा विचार करता त्या कमालीच्या विषम आहेत. शत्रूचे सैन्य पंचवीस हजार तर शिवरायांचे सैन्य पाच हजार, शत्रूचे पाच हजार तर शिवरायांचे पाचशे. प्रत्येक युध्द असेच प्रतिकुल आणि विषम शक्तीचे होते. तरीही शिवरायांनी शत्रूवर विजय मिळवला. टिच्चून स्वराज्य निर्माण केले. या सगळ्यामागे शिवाजीराजांचे अफाट बुध्दीसामर्थ्य, शोर्य, परोकोटीचा ध्येयवाद आणि रयतेची कनव होती. जर शिवरायांचे दैवतीकरण केले तर या सगळ्या पराक्रमाला चमत्काराची बेगड लावली जाईल. अवताराच्या कथा जोडल्या जातील.
शिवरायांनी एक माणूस म्हणून आभाळाच्या उंचीचे गाजवलेले दैदिप्यमान कर्तृत्व चमत्काराच्या भाकडकथांनी नाकारले जाईल. त्यातून सामान्य माणसाला मिळणारा अखंड उर्जेचा स्त्रोत आटून जाईल. राजे अवतार कथात अडकले तर संपून जातील. 'जय शिवाजी' म्हंटल्यावर रक्तात होणारी सळसळ थांबेल. शिवाजी राजे कुठल्याही भामट्या स्त्री-पुरूषांच्या अंगात येवू लागतील. त्यांच्या नावाने बदमाश बुवा-बाबांचे दरबार भरू लागतील. दैवतीकरणाने, अवतार कथांनी शिवाजी राजांचा पराक्रम व चरित्र खुजे होवून जाईल. भवानीने तलवार दिली, रामदास गुरू होते म्हणून शिवाजी राजे घडले, दादोजी कोंडदेवांनी घडवले वगैरे वगैरे कथा आधीच घुसडल्या आहेत. जातीयवादी पाजी बदमाशांनी शिवरायांच्या कर्तृत्वाला अप्रत्यक्ष नाकारण्याचा व त्याचे श्रेय आपल्याच जातभाईंना देण्याचे कट-कारस्थान केले आहे. ते यशस्वी होत नाही म्हणून जेम्स लेनच्या माध्यमातून राजांचा बाप बदलण्याचा घाट या बदमाशांनी घातला. अशा हरामखोरांच्या नादी लागून आपण शिवचरित्राचा कोथळा काढणे योग्य नाही. जे काम आदिलशहा, औरंगजेब, अफझल खानाला जमले नाही ते काम आपण जातीयवादी भटभुंज्यांच्या नादी लागून करायला निघालो आहोत. शिवचरित्राचा कोथळा काढणारी हरामखोरी करायला निघालो आहोत. या मातीतल्या प्रत्येक माणसाचे शिवरायांच्यावर अस्सल प्रेम आहे. शिवभक्ती इथल्या मातीत, मातीतल्या कणाकणात व प्रत्येकाच्या रक्तात आहे. काही भाबडे शिवभक्त या बदमाशांच्या कारस्थानाला बळी पडत आहेत. त्यांचा काही दोष नाही.
ते आरती करतात ते राजांच्या प्रेमापोटी व आदरापोटीच. त्यांचे शिवरायांच्यावरील निखळ आणि उत्कट प्रेमच यातून दिसते पण हे उत्कट प्रेम आरतीच्या माध्यमातून व्यक्त करायला लावण्यामागे मोठे कारस्थान आहे याचे त्यांना भान नाही. काही हलकट वृत्तीची जातीयवादी जमात त्यांना फसवत आहे. या पोरांना कारस्थानी लोकांची कारस्थानं कळत नाहीत. त्यांनी वेळीच सावध व्हावे आणि शिवरायांचे नाव घेत त्यांनाच संपवण्याचा डाव हाणून पाडावा. शिवरायांचे दैवतीकरण थांबवावे. प्रबोधनकार म्हणाले तसे तेहत्तीस कोटी देवांना रिटायर करणारा हा आपला शिवाजीराजा आभाळाच्या उंचीचा होता हे सांगायला त्यांना अवतार कथा आणि आरतीच्या कर्मकांडात अडकवायची गरज नाही. छत्रपती संभाजी राजांनी आरती न करण्याचे केलेले आवाहन अतिशय महत्वपुर्ण आहे. त्याला सर्वांनीच प्रतिसाद देऊया आणि शिवरायांना संपवण्याचा डाव हाणून पाडूया.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.