खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक परिक्षेची जाहिरात निघत नसल्याने...
गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली आणि कोरोनामुळे पुढे टप्प्या-टप्प्याने घेण्याचा निर्णय झालेल्या खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक परीक्षेची जाहिरात निघत नसल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये रोष पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे 2021 मध्ये पोलीस महासंचालकांनी काढलेल्या एकूण 750 जागांची मुदत 2023 मध्ये संपणार आहे. त्यामुळे सरकराने याबाबत निर्णय घेऊन मुदत संपण्याच्या आत खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक परीक्षेची जाहिरात काढण्याची मागणी पोलीस कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. तर याबाबत राज्यातील अनेक आमदार, मंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवदेन देखील पाठवले आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी फडणवीस यांना गेल्या महिन्यात पाठवलेल्या निवदेनात म्हटले होते की, "खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक परिक्षेबाबतचे एकुण 750 जणांचे मागणीपत्र ऑगस्ट 2021 मध्ये पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालयाकडुन गृहविभागास पाठविण्यात आले. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंजु 750 पदांमधील 250 पदांसाठी एमपीएससी (MPSC) मार्फत व मुख्य परिक्षा घेण्यात आली आहे. तरी ऑगस्ट 750 मंजुर मागणी पत्रकामधील उर्वरित 512 तसेच सन 2021 अखेर रिक्त असणाऱ्या 65 जागा असे एकुण 577 रिक्त जागा असून व सन 2022 व 2023 अखेर रिक्त होणाऱ्या सर्व जागांची एकत्रित मोठी जाहिरात काढून परीक्षा घेण्याची पोलीस अंमलदार यांची अपेक्षा आहे.
परंतु गृहविभाग, महाराष्ट्र राज्य येथे चौकशी केली असता आतापर्यंत पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालयाकडुन गृहविभाग, महाराष्ट्र राज्य यांना कोणतेही मागणी पत्रक अद्यापपर्यंत पाठवण्यात किंवा त्याविषयी बैठक घेण्यात आलेली नाही अशी माहिती समजली आहे. तरी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालयाकडुन गृहविभागास आतापर्यंत जास्तीत जास्त रिक्त पदांचे मागणी पत्रक तात्काळ पाठविण्यात यावे व गृह विभागाव्दारे पुढील कार्यवाही होण्यास आपणास विनंती आहे. जेणेकरून सर्व पोलीस अंमलदारांना समानतेची संधी उपलब्ध होईल, असे निवदेनात म्हटले आहे.
वय निघत चालेले...
दरम्यान पोलीस दलातील अनेक कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक परिक्षेची तयारी करत आहे. त्यातच कोरोना आल्याने फक्त 250 जागांची जाहिरात काढण्यात आली होती. मात्र परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेकांचे वाढते वय पाहता त्यांना या परीक्षेपासून मुकावे लागणार असल्याची भीती वाटत आहे. त्यामुळे लवकरात लवकर जाहिरात काढून, परीक्षा घेण्याची मागणी पोलीस कर्मचारी करत आहे. त्यामुळे आता गृहमंत्री फडणवीस यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.