Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गौतमी पाटील हिचं चेंजिंग रुममध्ये चोरुन चित्रीकरण

गौतमी पाटील हिचं चेंजिंग रुममध्ये चोरुन चित्रीकरण


मुंबई : डान्सर गौतमी पाटीलचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. गौतमी पाटीलचं चेंजिंग रुममध्ये चोरुन चित्रीकरण करण्यात आलंय. त्यानंतर संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी सोशल मीडियावर सकाळपासून संतापाची लाट उसळली आहे. अखेर या प्रकरणी राज्य महिला आयोगालादेखील दखल घ्यावी लागली आहे. महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरता कृती कार्यक्रम जाहीर करा, असा आदेश राज्य महिला आयोगाने सायबर विभाग आणि पोलीस महानिरीक्षकांना दिलेला आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटवरवर याबाबतची माहिती दिली आहे. “महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरिता कृती कार्यक्रम जाहीर करावा असे महिला आयोगाने सायबर विभाग, पोलीस महानिरीक्षक यांना पत्राद्वारे कळवले आहे”, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली. “लावणी कलाकार गौतमी पाटील यांचे चोरुन चित्रीकरण करत चेंजिंग रुममधील खासगी व्हिडिओ समाज माध्यमांवरून प्रसारित केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे येथे तक्रार नोंद करण्यात आली असल्याचे वृत्त आहे”, असं चाकणकर यांनी सांगितलं.

“एकंदरीतच महिलांच्याप्रती सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. हे प्रकार रोखण्याकरिता विशेष पथकाचे शीघ्र कृती दल स्थापन करून धडक कार्यवाही मोहीम राबविल्यास गुन्हेगारांना वचक बसून गैरप्रकार आटोक्यात येतील”, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.

गौतमीच्या बदनामीचा प्रयत्न?

गौतमी पाटील ही तरुणी अतिशय सर्वसामान्य घरातून पुढे आलीय. गौतमी जेव्हा प्रसिद्धीच्या झोतात आली तेव्हा तिच्या काही आक्षेपार्ह डान्स स्टेप्समुळे ती टीकेला कारण ठरली होती. त्यानंतर गौतमी पाटीलने जाहीरपणे माफी मागितली होती. पण त्यानंतरही गौतमीचे जुने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करुन तिची बदनामी करण्याचे प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून केले जात होते, असं गौतमीच्या चाहत्यांचं आणि तिचं स्वत:चं देखील मत आहे.

गौतमीच्या डान्समुळे आणि प्रसिद्धीमुळे अनेकांची दुकानं बंद झाल्याचा दावा तिच्या चाहत्यांकडून केला जात होता. या दरम्यान तिचा चेजिंग रुममधला एक व्हिडीओ समोर आला. संबंधित व्हिडीओ तिला नकळत तयार करण्यात आलाय. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. संबंधित व्हिडीओ पुढे शेअर करु नका, असं आवाहन अनेकांकडून करण्यात आलं. या प्रकरणाची महिला आयोगाने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात येत होती. अखेर महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.