परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेश नोंदणीसाठी वेब पोर्टल विकसित
मुंबई : महाराष्ट्रातील विद्यापिठांतर्गत नामांकित संस्थांमधून राबविण्यात येणाऱ्या नावीण्यपूर्ण अभ्यासक्रमांची माहिती परदेशातील विद्यार्थ्यांना व्हावी , आणि त्यांची प्रवेश नोंदणी प्रक्रिया सुलभ व्हावी , म्हणून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत www.mahacet.org हे वेब पोर्टल विकसीत करण्यात आले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज या वेबपोर्टलचे उद्घाटन सिंहगड शासकीय निवासस्थान मुंबई येथे करण्यात आले.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरीता सामाईक प्रवेश परीक्षा आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठाअंतर्गत शैक्षणिक संस्थांमध्ये पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवार पसंती देतात. त्यांची प्रवेश प्रक्रिया सुलभ आणि सोपी व्हावी, यासाठी हे वेब पोर्टल विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे परदेशी उमेदवारांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणीचा मार्ग अधिक सुलभ होईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त महेन्द्र ब. वारभुवन, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांच्यासह सबंधित अधिकारी उपस्थित होते. वेब पोर्टल हे प्रामुख्याने एनआरआय, एफएनएस, ओसीआय/पीआयओ व सीआयड्बल्यूजीसी या प्रवर्गातील उमेदवारांसाठी तयार करण्यात आले आहे. या पोर्टलवर विविध विद्यापीठांच्या संबंधित अभ्यासक्रमांची माहिती व आंतरराष्ट्रीय अभ्यास केंद्राच्या लिंक उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.