भारत सरकारने कोल्हापुरच्या जवानाला केले ‘पळपुटा’ घोषित
कोल्हापूर : भारत सरकारच्या भारत तिबेट सीमा पोलीस बलाने आज कोल्हापूरच्या एकाला ‘पळपुटा’ असे जाहीर केले. त्याबाबतची जाहीर नोटीस आज सकाळी वर्तमानपत्रात झळकली आहे. वरिष्ठांची अनुमती न घेता सतत गैरहजर राहिल्याने संबंधित पोलीस शिपायाला ही नोटीस बजावण्यात आली आहे. विजय गोविंद मांगले (रा. नरेवाडी ता. गडहिंग्लज) असे या शिपायाचे नाव आहे.
मांगले हे 9 ऑक्टोबर 2022 पासून वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनुमती न घेता सुट्टीवर आला आहे. संबंधित शिपायाने 25 ऑक्टोबरपर्यंत कामावर उपस्थिती लावावी, अशी सूचना भारत तिबेट सीमा पोलीस बलाने दिली होती. त्यानंतर ही उपस्थित न राहिल्याने त्यांचा अटक वॉरंट जारी केला होता. कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या नोटिसलाही उत्तर न देता मांगले यांनी दुर्लक्ष केले होते. अखेर भारत तिबेट सीमा पोलीस बलाने पोलीस बलाचे अधिनियम 1992 चे कलम 74 (2) नुसार मांगले या शिपायास ‘पळपुटा’ जाहीर केले. दिलेल्या नोटिसनुसार, आपल्या तीस दिवसापेक्षा अधिक सतत कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता गैरहजर राहिला आहात. त्यामुळे पळपुटा म्हणून तुम्हाला घोषित करण्यात येत आहे, अशी नोटीस बजावली आहे.
शेवटची संधी म्हणून, वृत्तपत्राच्या नोटिशीनंतर पंधरा दिवसाच्या कालावधीत आपण 5 वाहिनी भारत तिबेट सीमा पोलीस बलात लेह येथे उपस्थिती लावावी. अन्यथा तुम्हाला सेवेतून बडतर्फ करण्यात येईल,असा इशाराही पोलीस बलाच्या प्रमुखांनी दिला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.