धक्कादायक प्रकार धनंजय मुंडे यांच्या नावाचाही बनावट पेपर, सही, शिक्के!
महाविकास आघाडी सरकारमधील माजी मंत्री अशोक चव्हाण यांचे बनावट लेटरहेडचे प्रकरण ताजे असतानाच आता परळीतही बनावट सही- शिक्के आणि कागदपत्र तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष बाब म्हणजे यात माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह वैजनाथ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य सदाशिव मुंडे आणि प्रभाकर कराड यांच्या नावाचा वारंवार उल्लेख आहे. वैद्यनाथ महाविद्यालयाच्या अध्यक्षांचा शिक्का आणि बनावट सही करून ही कागदपत्र तयार करण्यात आल्याचे आढळून आले आहे. या बनावट कागदपत्र प्रकरणात जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यनाथ महाविद्यालयातील तीन प्राध्यापक आणि एका कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचा संशय आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून घेतला आहे.
काय आहे नेमका प्रकार?
परळी येथील वैद्यनाथ महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राचार्य सदाशीव सिताराम मुंडे यांनी पोलीस ठाण्यात सविस्तर फिर्याद दिली आहे. यानुसार एक बनावट पत्र तयार करण्यात आले आहे. यामध्ये बदनामी कारक खोटे दस्तावेज तयार करुन त्यावर अध्यक्ष म्हणून सदाशिव मुंडे असे नाव, सही व संस्थेचा बनावट शिक्का वापरण्यात आलेला आहे. तसेच बनावट पत्र तयार करून त्याच्या प्रती राज्यपाल कुलपती राजभवन महाराष्ट्र, उच्च तंत्र शिक्षण व संसदीय कार्य मंत्री, उच्च शिक्षण संचालक पुणे व सर्व विभागीय संचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील अधीसभा, विद्यापरिषद आणि अभ्यास मंडळ या निवडणूक प्रक्रियेद्वारे निवडून आलेले सर्व सदस्य यांना माहितीस्तव असा उल्लेख असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
बदनामीकारक मजकूर…
बनावट पत्रक तयार करून त्यावर आपल्या सही सारखी सही करून तसेच जवाहर एज्युकेशन संस्थेचा शिक्का वापरून माझी व संस्थेची फसवणूक केली. तसेच आपली आणि लोकप्रतिनिधी धनंजय मुंडे आणि प्रभाकर कराड यांच्या नावलौकीकास बाधा येईल व बदनामी व्हावी अशा मजकुराचे पत्र तयार केले. ते शासनास तसेच संस्थेतील इतर पदाधिकारी यांना पोस्टाद्वारे छायांकीत प्रत प्रसारीत केली. तसेच आपल्या घराचे गेट समोर आणून टाकली असे सदाशिव मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
तिघांविरोधात गुन्हा
संस्था अध्यक्षांचा शिक्का व बनावट सही करून तयार करण्यात आलेल्या या पत्राप्रकरणी वैद्यनाथ महाविद्यालयातील संशयित आरोपीत रमाकांत माणीकराव फड, संजय भानुदास रनखांबे, प्रा. सोमनाथ विश्वनाथ किरवले, प्रा. सागर उत्तम शिंदे या तीन प्राध्यापक व एका कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.