Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोटनिवडणुकीत उमेदवारांसाठी ‘स्वस्ताई’

पोटनिवडणुकीत उमेदवारांसाठी ‘स्वस्ताई’




करोनानंतर सर्वत्र महागाई आणि मंदीची चर्चा सुरू असताना जिल्हा प्रशासनाने मात्र पोटनिवणुकांच्या निमित्ताने ‘स्वस्ताई’ आणली आहे. कसबा, चिंचवड पोटनिवडणूक खर्चाचा हिशेब ठेवण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या दरसूचीत शाकाहारी जेवण ८१ रुपये, मांसाहारी जेवण २०० रुपये, चहा दहा रुपये, कॉफी १५ रुपये, वडा पाव १४ रुपये…असे कमी दर ठेवल्याने कार्यकर्त्यांमधून ‘होऊ द्या खर्च’ची मागणी वाढण्याची शक्यता आहे.

निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करण्यात सुसूत्रता येण्यासाठी निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना दरसूची ठरवून दिली जाते. त्यानुसार उमेदवारांना खाद्य पदार्थ आणि प्रचार साहित्याचा खर्च दाखवावा लागतो. पोटनिवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला ४० लाख रुपये खर्च करण्यास मुभा आहे. दरसूचीमध्ये शाकाहारी जेवण ८१ रुपये, मांसाहारी जेवण २०० रुपये, चहा दहा रुपये, कॉफी १५ रुपये, वडा पाव १४ रुपये, पोहे व उपमा १२ रुपये, साबुदाणा खिचडी १७ रुपये, पाण्याचा जार (२० लि.) ३९ रुपये असे दरपत्रक जाहीर झाले आहे. परिणामी कमी पैशांत जादा वस्तू घेता येणार असल्याने कार्यकर्त्यांमधून ‘होऊ द्या खर्च’ची मागणी वाढणार असून खर्च सादर करणाऱ्या कार्यकर्त्यांची दमछाक टाळण्यास थोडी मदत होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रत्येक दिवसाचा केलेला खर्च उमेदवारांना सादर करावा लागतो. हा खर्च सादर करताना प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक साहित्याचा हिशोब निश्चित केलेल्या दरपत्रकाप्रमाणे उमेदवाराला द्यावा लागतो. प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या झेंड्यापासून ते सभामंडप उभारण्यासाठी लागणाऱ्या साहित्यापर्यंत, प्रचारासाठी लावण्यात येणारी वाहने, प्रचारफेरी, मिरवणूक काढताना लावण्यात येणारे ढोल-ताशे, बँडपथक आणि वाहने, सत्कारासाठी वापरण्यात येणारे फेटे, पगडी, पुष्पगुच्छ, चहा, न्याहरी, जेवण, याचा या दरपत्रकामध्ये समावेश करण्यात आला आहे.

जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेले दरपत्रक, कंसात रुपये

कापडी मंडप (पत्राशेडसह) प्रति चौ.मी. (२४२), फायबर/प्लास्टिक खुर्ची (नऊ), हारतुरे लहान (१२०), फटाके एक हजाराची माळ (१८०), साधा फेटा (१८०), एक्झिकिटिव्ह खुर्ची (३००), झेंडा १८ बाय २८ इंच (१२), छापील उपरणे (दहा), रिक्षा प्रतिदिन ८० कि.मीपर्यंत (१२००), बाटलीबंद पाणी २५० एमएल २४ नग (१३८), पाण्याचा जार २० लि. (३९), फूड पॅकेट- पाच पुरी, सुकी भाजी, लोणचे व चटणी प्रतिताट (३०)


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.