Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कसब्यात मनसेचा भाजपला पाठिंबा; प्रचारात उतरण्याबाबत राज ठाकरे घेणार अंतिम निर्णय

कसब्यात मनसेचा भाजपला पाठिंबा; प्रचारात उतरण्याबाबत राज ठाकरे घेणार अंतिम निर्णय


पुणे : कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. मात्र, भाजप उमेदवार हेमंत रासने आणि अश्‍विनी जगताप यांच्या प्रचारात मनसेचे पदाधिकारी अथवा कार्यकर्ते सहभागी होणार नाहीत, असे मनसे नेते राजेंद्र वागसकर यांनी मंगळवारी सांगितले.

दरम्यान, कसबा विधानसभा मतदारसंघात 2012 च्या निवडणुकीत मनसेचे सर्वाधिक नगरसेवक या भागातूनच निवडून आले होते. त्यामुळे मनसेच्या पाठिंब्याचा भाजपला फायदा होणार आहे. कसबा आणि चिंचवड निवडणुकीबाबत पक्षाची भूमिका ठरविण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी कोअर कमिटीची बैठक बोलविली होती. या बैठकीस मनसे नेते राजेंद्र वागसकर यांच्यासह अनिल शिदोरे, सरचिटणीस अजय शिंदे, किशोर शिंदे, बाळा शेडगे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पदाधिकाऱ्यांनी भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. मात्र, मनसे ही निवडणूक लढवत नसल्याने तसेच ज्या ठिकाणी पक्षाचा उमेदवार नाही, त्या ठिकाणी पक्ष प्रचार करण्याचे धोरण नसल्याने शहर पदाधिकारी भाजपच्या बैठका, मेळावे, प्रचार सभा तसेच फेऱ्यांमध्ये सहभागी होणार नसल्याची भूमिका मांडली. मात्र, ठाकरे यांनी त्याबाबत निर्णय घेतलेला नसून पुढील दोन दिवसांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात येणार असून ते प्रचारात सहभागी व्हायचे की नाही, याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे वागसकर यांनी स्पष्ट केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.