माथाडी कामगारांचा आज राज्यव्यापी संप..
मुंबई : माथाडी कामगारांनी आज राज्यव्यापी संप पुकारला आहे. या संपामुळे नवी मुंबईतील पाचही मार्केट बंद आहेत. पहाटे सुरू होणाऱ्या भाजीपाल्याच्या मार्केटमध्येही कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. माथाडी कामगारांच्या संपामुळे भाजीपाला तसेच कडधान्याचा आज तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचसोबत भाजीपाला आणि कडधान्य आज महागण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी करण्यात काम बंद आंदोलन करण्यात आले आहे. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली माथाडी कामगारांचे काम बंद आंदोलन करण्यात आले आहे. माथाडी कामगारांच्या शासनाच्या विविध विभागाअंतर्गत असलेल्या न्याय प्रश्नांची सोडवण्यासाठी तातडीने लक्ष दिले जावे, अन्यथा माथाडी कामगारांना तीव्र आंदोलन करण्याचा पवित्रा घेणे भाग पडेल, असा इशाराही माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी दिला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांकडे कायम दुर्लक्ष केले आहे. संप, आंदोलने, बैठका झाल्या परंतु माथाडी कामगरांचे प्रश्न तसेच आहेत. त्यामुळे माथाडी कामगारांमध्ये कमालीचा असंतोष पसरला असून, कामगारांनी लाक्षणिक संप करण्याचा निर्णय घेतला आहे.
काय आहे माथाडी कामगारांच्या मागण्या?
माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करुन त्यावर कामगारांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघटनांच्या प्रतिनिधींची सदस्य म्हणून नेमणूक करावी. सुरक्षा रक्षक कामगार सल्लागार समितीची पुनर्रचना करावी विविध माथाडी मंडळाच्या पुनर्रचना करुन त्यावर युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात सदस्यांच्या नेमणुका करणे. विविध माथाडी मंडळातील कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देणे. माथाडी कायदा व विविध माथाडी मंडळांच्या योजनेतील त्रुटी दूर करण्यासंबंधी विशेष समिती गठीत करणे.
विविध रेल्वे यार्डात माथाडी कामगार व अन्य घटकांसाठी सुविधा उपलब्ध करणे माथाडी कामगारांच्या कामात अडथळा आणून कामगारांवर दहशत करणा-या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना आळा घालण्यासाठी संबंधितांची समिती गठीत करणे. बाजार समितीच्या मापाडी/तोलणार कामगारांना बाजार समितीच्या कार्यालयीन सेवेत घेणे सिडकोमार्फत माथाडी कामगारांना नवीमुंबई परिसरात तयार घरे मिळणे.
नवीन सरकार स्थापन होऊन अनेक महिने झाले तरी अद्याप माथाडी कामगारांच्या प्रश्नावर एकही बैठक झाली नाही. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. येत्या महिनाभरात सरकारने सकारात्मक भूमिका न घेतल्यास अधिवेशनात माथाडी विधानभवनात धडकतील असा इशारा माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी दिलाय. एपीएमसीच्या पाच मार्केट्समध्ये रोज किमान 25 कोटी रुपयांची उलाढाल होते. बंदमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.