Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धनंजय मुंडे यांच्या नावानं मंत्रालयात बोगस लिपिक भरती!

धनंजय मुंडे यांच्या नावानं मंत्रालयात बोगस लिपिक भरती!


मुंबई  : माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाने मंत्रालयात बोगस नोकर भरती कारभार सुरु असल्याचं उघड झालंय. मुंडे यांच्या नावाचा वापर करून लिपिकाच्या नियुक्ती आदेशाचे बनावट पत्र देण्यात आल्याचं आढळलंय. पोलिसांनी या प्रकरणी काही जणांना अटक केलेली असली तरी हे रॅकेट अजून किती विस्तारलेलं आहे, या शंकेने मंत्रालयात खळबळ माजली आहे. बोगस लिपिक भरती रॅकेट प्रकरणी गोवंडी पोलिसांनी मंत्रालयातील एक कर्मचारी तसेच अन्य तीन व्यक्तींची चौकशी करण्यात आली आहे. तसेच निखिल माळवे, शुभम मोहिते आणि नीलेश कुडतरकर या तिघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर निखिल माळवे याला अटक करण्यात आली आहे.. हे रॅकेट आणखी किती फोफावलंय, यात कुणा मोठ्या अधिकारी किंवा नेत्याचा हात आहे का, याची चौकशी केली जातेय.

कसा उघडकीस आला प्रकार?

मुंबई महापालिकेतून रिटायर्ड झालेले यशवंत लक्ष्मण कदम यांनी यासंबंधीची तक्रार दिली आहे. पोलिसांनी संबंधित तक्रारीवरून गुन्हा नोंदवला आहे. गोवंडी येथील यशवंत कदम यांचा मुलगा रत्नजित हा एमएससी झाला आहे. रत्नजितने व्हॉट्सअपवर सरकारी नोकरीची जाहिरात पाहिली. त्या जहिरातीतून निखिल माळवे याच्याशी संपर्क साधला. माळवे याने रत्नजितला मंत्रालयातील सामाजिक न्याय विभागात लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवलं. यासाठी आधी 30 हजार रपुयांची मागणी केली. नंतर पैशांची मागणी वाढतच गेली.

माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत काढलेले फोटो दाखवले. त्यानंतर रत्नजितला मंत्रालयात मुलाखतीसाठी बोलवून शुभम मोहिते याच्याशी भेट घडवून आणली. मोहिते हा मुंडे यांच्या कार्यालयात शिपाई असल्याचं सांगण्यात आलं. त्याच्या व्हॉट्सअप डीपीलाही मुंडे यांच्या फोटो होता. त्यानंतर कांबळे नावाच्या व्यक्तीला भेटून नोकरीसंदर्भात कागदपत्र देण्यात आली. त्याने 1 डिसेंबर 2021 रोजी धनंजय मुंडे यांच्या नावाचं बनावट आदेशपत्र रत्नजितला मेल केलं. ही निवड तात्पुरती असल्याचं सांगून 29जानेवारी 2021 पर्यंत कार्यालयात उपस्थित राहून नोकरीचे आदेश घेण्यास सांगण्यात आलं.

ठरलेल्या तारखेला रत्नजित नोकरीचं पत्र घेण्यासाठी मंत्रालयात गेला. त्यावेळी शुभम नॉट रिचेबल होता. तसेच तो धनंजय मुंडे यांच्यासोबत दौऱ्यावर असल्याचं खोटं सांगण्यात आलं. तर नीलेश कुडतरकर याने मंत्रालयातील सगळं काम होणार असल्याचं आश्वासन दिलं. पण ही फसवणूक असल्याचं लक्षात येताच रत्नजित व त्याच्या वडिलांनी पोलिसात धाव घेतली.

7 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक

कदम यांनी बचतीचे सर्व पैसे मिळून निखिल माळवेला एकूण ७ लाख ३० हजार रुपये दिल्याची तक्रार केली आहे. सदर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी कदम कुटुंबियांची मागणी आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.