सव्वा कोटींचा गुटखा पोलीसांच्या ताब्य़ात..
उंब्रज: यशवंतनगर ता. कराड गावच्या हद्दीत रात्रीच्या वेळी होणारी गुटखा वाहतूक रोखण्यात तळबीड पोलिसांना यश आले असून तब्बल ८३ लाखांच्या गुटख्यासह सव्वा कोटीचा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी कंटेनर चालकासह दोघांना अटक केली आहे. कराड ते मसुर रस्तावर मंगळवारी २१ रोजी पहाटे ही कारवाई करण्यात आली. बेकायदेशीर रित्या वाहतूक करणाऱ्या गुटख्याचा कंटेनर तळबीड पोलिसांनी ताब्यात घेतला असून एक कोटी तेरा लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. कंटेनर मध्ये 83 लाखांचा गुटखा मिळून आला आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान परराज्यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुटखा येतो. महामार्ग व चोरट्या मार्गाने होणाऱ्या गुटखा वाहतूकीवर आजवर अनेक कारवाई झाल्या आहेत. मात्र पहिल्याच मोठी कारवाई करण्यात तळबीड पोलिसांना यश आले असून गुटखा बंदीनंतर आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई तळबीड पोलिसांकडून झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशानुसार २१ फेब्रुवारी दरम्यान रात्री अकरा ते पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान तळबीड पोलिसांकडून नाकाबंदी नेमण्यात आली होती. त्यादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्री करण्यासाठी बंदी असताना कर्नाटक राज्यातून कर्नाटक राज्यातून एक कंटेनर गुटखा वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांनी तळबीड पोलीसांचे पथक तयार करून मसूर रोडवर सापळा लावला.
माहितीच्या आधारे संबंधित कंटेनरची पोलीस वाट पाहत असताना पहाटे 3:45 वाजता यशवंतनगर गावच्या हद्दीत कराडकडून सदरचा कंटेनर येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी शिताफीने कंटेनर थांबवून चालकास त्याचे नाव इतर माहिती विचारली असता त्याने मोहम्मद ताजुद्दीन सैफुनसाब बालवाले राहणार असे नाव सांगितले तसेच गाडीत काय आहे अशी विचारणा केली असता त्याने गाडीमध्ये कोंबडी खाद्य असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी गाडीतील मालाची खात्री केली असता तसेच पोलिसांनी कंटेनर मधल्या मालाची तपासणी केली असता त्यामध्ये गुटख्याची पोती मिळून आली. हा गुटखा पर राज्यातील असून तब्बल ८३ लाख ९ हजार २९६ रुपये किमतीचा असल्याचे निष्पन्न झाले. गुटख्याची पोती अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी विकास सोनवणे व वंदना रुपनवर यांनी ताब्यात घेतली असून ती सातारा येथील गोडाऊनला रवाना करण्यात आली आहेत.
महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या अन्नपदार्थामध्ये गुटखा विक्री व वाहतूकीस बंदी आहे. याप्रकरणी संशयित महंमद ताजुद्दीन सैफुनसाब बालवाले राहणार नरोना तालुका आलम, जिल्हा गुलबर्गा राज्य कर्नाटक व मेहबूब बाबुमिया राहणार उडबल तालुका हुमनाबाद जिल्हा बिदर राज्य कर्नाटक यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुर वरोटे करत आहेत. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, विभागीय पोलीस अधिकारी रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनासोर सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे व तळबीड पोलीस ठाण्याचे फौजदार गोपीचंद बाकले, आप्पा ओंबासे, शहाजी पाटील, निलेश विभूते, महेश शिंदे व कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.