Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीवर अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीवर अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन 


सांगली :- केंद्र शासनाच्या प्राणी क्लेष प्रतिबंधक अधिनियम,१९६० मधील तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यामध्ये प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. या समितीवर अशासकीय सदस्यांची  नियुक्ती करण्यासाठी  मानवहितकारक कार्य करणाऱ्या,  प्राणी कल्याणासाठी काम करणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी त्यांचे अर्ज संबंधित कामाच्या संपूर्ण तपशिलासह जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, सांगली (मुख्यालय मिरज) येथे दि. २२ फेब्रुवारी २०२३ अखेर समक्ष अथवा टपालाने अथवा ई-मेलने सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एस.एस.बेडक्याळे यांनी केले आहे.

व्यवस्थापकीय समितीवर गोशाळा अथवा पांजरपोळ संस्थेचे अध्यक्ष, प्राणी कल्याणविषयक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांचे सदस्य, मानवहित कार्य करणाऱ्या / प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या/ प्राण्यांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या व्यक्ती इ. क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात येत असते. प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी, सांगली च्या समितीतील यापूर्वी नियुक्ती झालेल्या अशासकीय सदस्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आलेला असल्याने इच्छुक व पात्र व्यक्तींकडून नव्याने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी, सांगली च्या व्यवस्थापकीय समितीवर पुढीलप्रमाणे विविध गटांमधून अशासकीय सदस्यांची  नियुक्ती करण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यातील गोशाळा अथवा पांजरपोळ संस्थांपैकी एका संस्थेचा अध्यक्ष, प्राणी कल्याणविषयक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांचे दोन सदस्य, सर्वसाधारण समितीने नामनिर्देशित केलेल्या दोन व्यक्ती, सांगली जिल्ह्यातील मानवहितकारक कार्य करणारे / प्राण्यांवर प्रेम करणारे / प्राणी कल्याणासाठी काम करणारे ५ ते ६ कार्यकर्ते.

इच्छुक व्यक्तींकडून मानवहितकारक कार्य /  प्राणी कल्याणासाठी काम केल्याच्या संपूर्ण तपशिलासह अर्ज मागविण्यात येत आहेत. प्राप्त होणाऱ्या अर्जांच्या छाननीसाठी इच्छुक व्यक्तींच्या प्राणी कल्याणाच्या कामाचा अनुभव तसेच प्राणी कल्याण कायद्याचे ज्ञान या बाबींचा प्राधान्यक्रमाने विचार करण्यात येणार आहे. छाननीनंतर पात्र असणाऱ्या व्यक्तींच्या चारित्र्याची पडताळणी पोलीस प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे. त्यानंतर चारित्र्य पडताळणी अहवाल अनुकूल असणाऱ्या व्यक्तींची शिफारस प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी मार्फत शासनास करण्यात येणार आहे. त्यानंतर प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीवरील अशासकीय सदस्यांची नियुक्ती शासन स्तरावरून करण्यात येणार आहे. 

कार्यालयाचा पत्रव्यवहाराचा पत्ता : जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, सांगली (मुख्यालय मिरज), डॉ. आंबेडकर रोड, जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय आवार, झरी बाग, मिरज ता.मिरज जि.सांगली पिन-४१६४१०, दूरध्वनी क्रमांक : ०२३३-२२२२२३३, ई-मेल आय डी : ddcahsangli@gmail.com.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.