Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी;'परभणी जिल्हा समृद्धी महामार्गाने पुणे-मुंबईला जोडणार'

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी;'परभणी जिल्हा समृद्धी महामार्गाने पुणे-मुंबईला जोडणार' 


परभणी: परभणी जिल्ह्यात काळी कसदार जमीन असल्यामुळे डांबरी रस्ते दीर्घकाळ टिकत नाहीत. त्यामुळे आगामी काळातील सर्व रस्ते हे सिमेंटपासून बनविण्यात येतील. महामार्गाच्या माध्यमातूनच जिल्ह्याचा विकास होतेा. त्यामुळे परभणी जिल्हा समृद्धी महामार्गाने पुणे आणि मुंबईला जोडणार असल्याची ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री निती गडकरी यांनी जिल्हावासीयांना दिली. जिल्ह्यातील पारवा-असोला बाह्यवळण रस्ता, जिंतूर-शिरड शहापूर आणि पाथरी ते सेलू या राष्ट्रीय महामार्गांच्या चौपदरीकरण आणि सुधारणेच्या भूमिपूजन व कोनशिलेचे अनावरण केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परिसरात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.

परभणी जिल्हा हा गोदावरी खोऱ्यात असल्यामुळे येथील काळ्या कसदार जमिनीमध्ये डांबरी रस्ते जास्त काळ टिकत नाहीत. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाच्या माध्यमातून बांधले जाणारे येथील सर्व रस्ते हे सिमेंटचेच बांधण्यात येतील. परभणी शहराला लागून जाणारा पारवा -असोला या बाह्यवळण रस्त्याचे भूमिपूजन आज करण्यात आले असून,दुसऱ्या बाह्यवळण रस्त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी यांनी पुढील सहा महिन्यात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लक्ष दिल्यास वर्षभरात त्याचेही काम सुरू करण्यात येईल, अशी घोषणा गडकरी यांनी यावेळी केली.

परभणी जिल्ह्याला समृध्दी महामार्गाद्वारे पुणे-मुंबईला कसे जोडता येईल, याकरिता आजच योजना तयार करायच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. गढी ते मानवत 500 कि.मी. चा रस्ता पूर्ण झाला आहे. परभणी जिल्ह्यात काळी जमीन असल्याने याठिकाणचे संपूर्ण रस्ते हे सिमेंट काँक्रिटचे करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. 972 कोटी रुपयांची 145 किलोमीटरची 4 कामे जी राष्ट्रीय महामार्ग विभाग करत असून ती प्रगतीपथावर आहेत. त्यात काही अडचणी होत्या, परंतू त्या आता सोडविण्यात आल्या आहेत.

कोल्हा ते नसरतपूर, परभणी ते गंगाखेड, वाटूर ते चारठाणा आणि परळी ते गंगाखेड ही सुमारे 1 हजार कोटीची 145.29 किलोमीटरची ही सर्व कामे पुढील सहा महिन्यात पूर्ण होणार आहेत. जिंतूर ते परभणी या 360 कोटी रुपयांच्या महामार्गाचे 90 टक्के काम झाले आहे. परभणी जिल्ह्यामध्ये जी महत्वाची नवीन महामार्गाची कामे करावयाची आहेत. त्यात चारठाणा ते जिंतूर या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी 250 कोटी रुपयांच्या कामास मंजुरी दिली. गंगाखेड ते लोहा 45 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 500 कोटी रुपयांच्या कामास मंजुरी दिली.

इंजेगाव ते सोनपेठ हा चार पदरी 25.5 किलोमीटरच्या काँक्रीट रस्त्यासाठी 260 कोटी रुपयांची मंजुरी देत आहे. इसद ते किनगाव दुपदरी 27.7 किलोमीटर रस्त्यासाठी 125 कोटी रुपयांच्या कामाची मंजुरी दिली. परभणी – गंगाखेड रस्त्यावरील गोदावरी नदीवरील पुलाकरिता 150 कोटी रुपयांची मंजुरी दिली. त्याच बरोबर गंगाखेड-लातूर राज्य महामार्गाचा जो रेल्वे उड्डाणपूल आहे, त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे जंक्शन असल्याने तो मंजूर केल्याची घोषणा केली. परभणीच्या दुसऱ्या बायपासचे जमीन संपादन होणे बाकी आहे ते लवकर पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे. गंगाखेड बायपासची मागणी करण्यात आली असून, त्याला राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पात समाविष्ट करुन हे काम करण्यात येईल. तसेच परभणी शहरात जाणारा मुख्य रस्त्याचे देखील विस्तारीकरण व सौंदर्यीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यावेळी केली.

जिल्ह्यात विविध सुविधांसह औद्योगिक वसाहत निर्माण केल्यास यामुळे स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतमालालाही चांगला भाव मिळणार आहे. ऊसापासून इथेनॉलनिर्मिती करता येते. पेट्रोलपेक्षा इथेनॉलचे दर खूप कमी आहेत. पुढील काळात इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती करण्यात येणार आहे. तरी साखर कारखानदारांनी इथेनॉलच्या निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा. यातून निश्चितच शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल, अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

रस्ते हे देशाच्या‍ विकासाची गती वाढवितात. जिल्ह्यातील जुन्या रस्त्यांचे नव्या तंत्रज्ञानावर आधारित दर्जात्मक रस्ते बांधणीसाठी लोकप्रतिनिधींनी आग्रही राहिले पाहीजे, असे त्यांनी सांगितले. मराठवाड्यातील औंढा येथील ज्योर्तिलिंग, नांदेडचे गुरु गोविंदसिंह गुरुद्वारा आणि संत साईबाबांचे पाथरी हे जन्मस्थान पक्क्या सिमेंट रस्त्यांनी बांधण्यात येत आहे. या संतांच्या भूमीतील जिल्ह्यांमध्ये दर्जात्मक रस्ते बांधताना जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि कंत्राटदारांनी एकत्रित आले पाहीजे, असे सांगून गडकरी यांनी पुणे-मुंबई सुपर एक्स्प्रेस वे बांधल्यानंतर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेबाबतच्या आठवणींना उजाळा दिला.

जिल्ह्यातील रस्ता बांधकामसाठी गेल्या तीन वर्षांपासून भूसंपादनाची प्रक्रिया रखडली आहे. ही कामे वेळेत का होत नाहीत, याचा गांभिर्याने विचार करण्याचे सांगत, जिल्ह्यात कमी किमतीत रस्ते बांधणी करणाऱ्या कंत्राटदारांच्या कामाच्या दर्जावर लक्ष ठेवले पाहीजे. त्यांनी चांगले रस्ते बांधावेत, यासाठी लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा केला पाहीजे. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात १२ रस्ते बांधणी प्रकल्प पूर्ण झाले असून, ऊर्वरित ११ रस्त्यांचे कामही येत्या सहा महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यावेळी दिला.

जिल्ह्यात जलसिंचन वाढवा

परभणी जिल्ह्याला गोदावरी आणि तिच्या उपनद्यांचे पाणी मिळते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सिंचनाच्या माध्यमांतून आर्थिक उन्नती होण्यास हातभार लागेल. त्यासाठी ग्रामीण भागात सिमेंटचे पक्के रस्ते होणे आणि तो भाग शहरांशी जोडला जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. येथील शेतकऱ्यांनी पाण्याचा पूर्ण क्षमतेने वापर करण्यावर लक्ष केंद्रीत करावे.

त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या सौरकृषि पंप योजनेचा लाभ घेत भविष्यात सौरकृषि पंपाच्या माध्यमातून आर्थिक स्तर ऊंचावण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले. शेतकरी अन्नदाता आहेच आता तो ऊर्जादाता झाला पाहिजे, असे सांगून बांबूपासून इथेनॉल निर्मिती करता येत आहे. तसेच शेतातील विविध टाकावू वस्तूंपासून इंधननिर्मिती करण्याकडे शेतकऱ्यांनी वळण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने येथील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यासाठी एकरी २० क्विंटल उत्पादन देणारे सोयाबीन वाणाचे संशोधन करण्याकडे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्र मणी यांचे लक्ष वेधले. जिल्ह्यातील शेतकरी समृद्ध आणि संपन्न होईल. त्यामुळे खेडीही समृद्ध आणि आत्मनिर्भर होतील, परिणामी परभणी हा जिल्हा मागासलेला नसून विकसित होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिला.

* पारवा -असोला परभणी बाह्यवळण रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ (२२२) च्या १५ किलोमीटरचे चौपदरीकरण करण्यात येत असून, त्यासाठी ४९६.६४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

* जिंतूर – शिरड शहापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ – १ च्या ४८ किलोमीटरची सुधारणा करण्यात येणार असून, या प्रकल्पाची किंमत ४१४.८१ कोटी रुपये आहे.

* पाथरी -सेलू रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ ब च्या १२.५ किलोमीटरच्या रस्त्याची सुधारणा करण्यात येणार असून त्यासाठी १४५.७६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.