गौतम अदानींवरून विरोधी पक्षांमध्ये फूट, काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचं सूचक विधान
हिंडेनबर्गने गौतम अदानी यांच्या कंपन्यांबाबत सादर केलेल्या अहवालामुळे उद्योगजगतात आणि शेअर बाजारामध्ये खळबळ उडालेली आहे. दरम्यान, अदानी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जवळीक असल्याचा आरोप करत विरोधी पक्षही आक्रमक झाले आहेत. अदानी प्रकरणावरून संसदेत जोरदार गदारोळ होत आहे. दरम्यान, आता अदानी प्रकरणावरून विरोधी पक्षांमध्ये फूट पडताना दिसत आहे.
अदानी विवाद प्रकरणात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पाळलेल्या मौनाबद्दल काँग्रेसने सवाल उपस्थित केले आहेत. ममता बॅनर्जी यांना या प्रकरणात गप्प राहण्यास सांगण्यात आले आहे, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे. काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले की, मला वाटते की, ममता बॅनर्जी आणि अदानी यांच्यात चांगले संबंध आहेत. कारण बंगालमधील ताजपूर येथे एक बंदर बांधले जात आहे. अदानी आमि मोदींसोबत ममता बॅनर्जी यांच्या संबंधांमध्ये बदल झाला आहे. त्यामुळे मोदींविरोधात त्या फार काही बोलत नाहीत. बंगालमध्ये आम्ही त्यांना फायटर म्हणून ओळखत होतो. मात्र आता त्या शांत झाल्या आहेत.
गौतम अदानी हे ताजपूर येथे बंदर बांधत आहेत. याबाबतच्या करारावर स्वाक्षऱ्याही झाल्या आहेत. ममता बॅनर्जींनी अदानी समुहाला हरप्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे अदानी यांच्या हितसंबंधांना बाधा येईल, असं ममता बॅनर्जी काहीही करणार नाहीत, असा दावाही अधीर रंजन चौधरी यांनी केला. कदाचित त्यांना अदानी आणि केंद्र सरकारविरोधात गप्प राहण्याबाबत सूचना मिळाल्या असाव्यात, असेही अधीर रंजन चौधरी म्हणाले.
काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष अदानी प्रकरणी चौकशीसाठी आक्रमक झालेले आहेत. त्यांच्याकडून संसदेच्या कामकाजामध्ये अडथळे आणले जात आहेत. मात्र या प्रकरणात ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसची रणनीती वेगळी दिसत आहे. तृणमूल काँग्रेस विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये सहभागी झालेला नाही. मात्र तृणमूल काँग्रेस पक्षाने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी विरोधी पक्षांनी केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता, तसेच या आंदोलनात सहभाग घेतला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.