केरळ हायकोर्टाने केले स्पष्ट; प्रत्येक रुग्णाचा मृत्यू वैद्यकीय निष्काळजीपणा नसतो..
तिरुवनंतपूरम : प्रत्येक रुग्णाच्या मृत्यूला वैद्यकीय निष्काळजीपणा म्हणता येणार नाही. दुर्दैवाने अपेक्षित यश न आल्यास डॉक्टरांना जबाबदार धरता येणार नाही, असे केरळ हायकोर्टाने म्हटले आहे. २००६ मध्ये लेप्रोस्कोपीद्वारे नसबंदीनंतर मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे हे प्रकरण आहे.
शस्त्रक्रियेनंतर तिला श्वासोच्छवासाचा त्रास सुरू झाला. तिला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. दुसऱ्या रुग्णालयातही हलवण्यात आले; पण तिचा मृत्यू झाला. तिच्या काकांनी वैद्यकीय निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला. सत्र न्यायालयाने सर्जन, भूलतज्ज्ञ आणि ३ परिचारिकांना ३०४ अ (निष्काळजीपणामुळे मृत्यू) आयपीसीसाठी एक वर्षाची आणि २०१ (पुरावा नष्ट करणे) साठी ३ महिन्यांची शिक्षा सुनावली. याविरुद्ध हायकोर्टात अपील करण्यात आले.
हायकोर्टाने असा निष्कर्ष काढला की, महिलेचा जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. रुग्णाच्या शस्त्रक्रियेपूर्वी किंवा नंतरच्या व्यवस्थापनातील त्रुटी हे मृत्यूचे थेट कारण असल्याचे सूचित करणारे कोणतेही पुरावे नाहीत. प्रकरण दुर्दैवी आहे. परंतु रुग्णाने उपचारांना अनुकूल प्रतिसाद दिला नाही किंवा शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्यास डॉक्टरांना निष्काळजी म्हणता येणार नाही. केवळ शस्त्रक्रियेच्या नोट्स किंवा केसशीट योग्यरीत्या राखण्यात अयशस्वी होणे, हे पुरावे नष्ट करणे ठरू शकत नाही.
डॉक्टर देव आहेत, हे एक मिथक असले तरी ते पृथ्वीवरील सर्वात नाजूक आणि गुंतागुंतीच्या यंत्राशी-मानवी शरीराशी सामना करण्याचा धोका पत्करतात. डॉक्टरांवर प्रतिकूल किंवा अप्रिय घटनेचा आरोप करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. अपयशी झाल्यास खटल्याला सामोरे जाण्याच्या भीतीने सर्जन सर्वोत्तम कामगिरी करू शकत नाहीत. -न्या. कौसर एडप्पगठ, केरळउच्च न्यायालय
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.