Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बच्चू कडूंची पुन्हा नाराजी..

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बच्चू कडूंची पुन्हा नाराजी..


राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार जानेवारीअखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात होण्याचा अंदाज बांधला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना, विधिमंडळ अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्तार होईल, असे सांगतिले आहे. त्यामुळे, मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. सांगली जिल्ह्यातील बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्यासह भाजप आमदार सुधीर गाडगीळ, आ. गोपीचंद पडळकर यांची नावे चर्चेत आली आहेत. तर, नाराज आमदार बच्चू कडू यांच्याही नावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता, बच्चू कडू यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

राज्यपालांची राजीनामा देण्याची इच्छा, शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती तसेच कसबा आणि पिंपरी चिंचवडची पोडवणूक यांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता मंत्रिमंडळ विस्तारावरूनही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत. शिंदे गटातील आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू हेही मंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन स्पष्ट करायला हवं, असे आमदार कडू यांनी म्हटले आहे.

अमरावतीमध्ये बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर आज पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल अजून काही खरं दिसत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदारांची बैठक घेतली पाहिजे. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत स्पष्टता झाली पाहिजे. कारण विस्तारावरून बऱ्याच आमदारांमध्ये संभ्रम सुद्धा निर्माण झाला आहे, अशी माहितीही आमदार बच्चू कडू यांनी दिली. काय म्हणाले मुख्यमंत्री

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची माहिती दिली नाही. सध्याच्या मंत्रिमंडळात एकूण २० मंत्री आहेत. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वाधिक खाती आहेत. ९ शिंदे गटाचे आणि ९ भाजपाचे मंत्री आहेत. शिंदे फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार मागील ४ महिन्यापासून रखडला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.