Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नसीरुद्दीन शाह यांचं मुघलांविषयीचं वक्तव्य चर्चेत..

नसीरुद्दीन शाह यांचं मुघलांविषयीचं वक्तव्य चर्चेत..


मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मुघलांविषयी वक्तव्य केलं आहे. झी 5 वरील त्यांची ‘ताज- डिवायडेड बाय ब्लड’ ही वेब सीरिज सध्या खूप चर्चेत आहे. यामध्ये त्यांनी राजा अकबरची भूमिका साकारली आहे. ही वेब सीरिज मुघलांच्या काळातील राजा-महाराजांचं काम आणि त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांविषयी आहे. नसीरुद्दीन शाह हे त्यांचे विचार बेधडकपणे मांडण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांनी मुघलांविषयी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. मुघलांचा अपमान नाही केला पाहिजे, असं त्यांनी म्हटलंय.

“लोकांना अकबर आणि तैमूर यांच्यातला फरक माहित नाही”

जे लोक त्यांना विरोध करतात, ते त्यांना कधीच समजू शकणार नाहीत, असं नसीरुद्दीन म्हणाले. देशात जे काही चुकीचं घडलं ते मुघलांच्या काळात घडलं, असं मानणाऱ्या देशाकडे तुम्ही कसं पाहता असा सवाल त्यांना विचारला गेला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, “मला आश्चर्य वाटतं, कारण हे खूप हास्यास्पद आहे. लोकांना अकबर आणि खुनी आक्रमक नादर शाह किंवा बाबरचे पणजोबा तैमूर यांच्यातला फरक समजत नाही. हे ते लोक होते, जे इथे लुटायला आले होते. मुघल इथे लूट करण्यासाठी आले नव्हते. हा देश आपला घर बनवावा या उद्देशाने मुघल इथे आले होते आणि त्यांनी तेच केलं. त्यांच्या योगदानाला कोण नाकारू शकतं?”

याविषयी बोलताना ते पुढे म्हणाले, “मुघल हेच सर्व वाईट गोष्टींचं मूर्त स्वरुप होते, असा विचार करणं म्हणजे एखाद्याला देशाच्या इतिहासाची नीट समज नाही असं दिसतं. कदाचित इतिहासाची पुस्तकं भारताच्या स्वदेशी संस्कृतीच्या किंमतीवर मुघलांचा गौरव करण्यापर्यंत खूप दयाळू असतील. परंतु इतिहासातील त्यांचा काळ आपत्तीजनक आहे म्हणून टाकून देऊ नये.”

शाळांमधील इतिहासाच्या अभ्यासाविषयी वक्तव्य

“अर्थातच ते एकटेच नाहीत. दुर्दैवाने शाळेतील इतिहास हा बहुतांश मुघल आणि इंग्रजांवर आधारित होता. आपल्याला लॉर्ड हार्डी, लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि मुघल सम्राट यांच्याविषयी माहिती होती, मात्र आपला गुप्त वंश, मौर्य वंश, विजयनगर साम्राज्य, अजंताच्या गुहांचा इतिहास किंवा पूर्वोत्तराविषयी माहिती नव्हती. आपण यापैकी कोणतीच गोष्ट वाचली नाही कारण इतिहास इंग्रज किंवा अँग्लोफाइल्सद्वारा लिहिली गेली होती आणि मला वाटतं ती हे वास्तवात खूप चुकीचं आहे”, असं ते पुढे म्हणाले.

“मुघलांना खलनायक बनवण्याची गरज नाही”

मुघलांविषयी बोलताना ते पुढे म्हणाले, “लोक त्यांच्याविषयी जे म्हणतायत ते काही अंशी खरं आहे की आपल्या स्वदेशी परंपरांच्या किंमतीवर मुघलांना मोठं केलं गेलंय. हे खरं असलं तरी त्यांना खलनायक बनवण्याचीही गरज नाही. जर मुघल साम्राज्य इतकं वाईट होतं तर त्यांचा विरोध करणारे त्यांनी बनवलेल्या स्मारकांना पाडून का टाकत नाहीत?”

“.. तर ताज महाल, लाल किल्ला, कुतूब मिनार पाडून टाका”

“जर त्यांनी केलेली प्रत्येक गोष्ट भयानक असेल, तर ताज महाल, लाल किल्ला, कुतूब मिनार पाडून टाका. लाल किल्ल्याला आपण पवित्र का मानतो, ते मुघलांनी बांधलं होतं. आपल्याला त्यांचा गौरव करण्याची गरज नाही, पण किमान त्यांनी बदनामी करण्याचीही गरज नाही”, असं मत त्यांनी मांडलं.

सध्याच्या घडीला अशा बौद्धिक चर्चा होऊ शकतात का, असा प्रश्न विचारला तर ते म्हणाले, “नाही, अजिताबतच नाही. टिपू सुलतानलाही खलनायक बनवलं गेलंय. इंग्रजांना काढण्यासाठी त्याने आपलं सर्व आयुष्य घालवलं आणि आता विचारलं जातं की तुम्हाला टिपू सुलतान पाहिजे की राम मंदिर? यात काय लॉजिक आहे? मला वाटत नाही की इथे चर्चा होऊ शकते. कारण त्यांना माझा दृष्टीकोन समजणार नाही आणि मला त्यांचा समजू शकत नाहीये.”


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.