आदित्य ठाकरेंच्या गाडीवर झालेला हल्ला शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांकडून...
अंबादास दानवेंचा आरोप
आमदार आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येणार आहे, त्यामुळं काही लोकांनी जाणीवपूर्वक एकत्र येऊ नये म्हणून हे कारस्थान केल्याचे दानवे म्हणाले. आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत सरकारकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. सरकारने त्यांची सुरक्षा वाढवावी अशी मागणी दानवे यांनी केली.
नेमकं प्रकरण काय?
शिवसेना आमदार आदित्य ठाकरे हे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे यांच्या गाडीसमोर काही जणांनी गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. डीजे बंद केल्याच्या रागात काही लोकांकडून गोंधळ घालण्यात आल्याची माहिती मिळत आहे. महालगाव येथे आदित्य ठाकरेंचा कार्यक्रम आणि रमाईंची मिरवणूक एकावेळी सुरु झाली होती. अशावेळी रमाईंची मिरवणूक थांबवल्यानं किरकोळ दगडफेक झाल्याची माहिती मिळत आहे. अशात बाहेर काही काळ गोंधळ बघायला मिळाला. काही जणांनी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचेही समोर आले आहे. त्याशिवाय काही लोकांनी पपईचे तुकडे त्यांच्या गाडीच्या ताफ्यावर फेकल्याचं समोर आले आहे. यामुळं काही वेळ तिथं तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती.
चंद्रकांत खैरे यांचे भाषण सुरु असताना अज्ञाताने स्टेजवर भिरकावला दगड
आदित्य ठाकरे महालगावात पोहोचल्यावर त्यांचा ठाकरे गटाच्या नेत्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं होतं. यावेळी ठाकरे गटातील महत्वाच्या नेत्यांची भाषणे झाली. मात्र, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे भाषण सुरु असताना अज्ञात व्यक्तीने स्टेजवर दगड भिरकावला. त्यामुळं यावेळी गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, खैरे यांनी आपले भाषण चालूच ठेवेले. त्यानंतर सभा संपल्यावर पुन्हा एकदा आदित्य यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा सुरू
आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा सरु झाला आहे. आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा नाशिक, जालना, बीड, औरंगाबादमध्ये होणार आहे. आज आदित्य ठाकरे हे सोमठाणा, बदनापूर, जि. जालना (संवाद), वेळ - सकाळी 11.30 वाजता, रामनगर, जालना (संवाद), वेळ - दुपारी 1.15 घनसावंगी, जि. जालना (संवाद), वेळ - दुपारी 3, गेवराई, जि. बीड (संवाद), वेळ - सायंकाळी 4.35 उपस्थित राहणार आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.