शरीरात एकही किडनी नसताना जगतेय महिला..
पाटणा : मानवी शरीरातला प्रत्येक अवयव हा महत्त्वपूर्ण असतो. कोणत्याही कारणाने एखाद्या अवयवाला इजा झाली किंवा तो निकामी झाला तर संबंधित व्यक्तीचा जीव धोक्यात येऊ शकतो. किडनी अर्थात मूत्रपिंड हादेखील शरीरातला महत्त्वाचा अवयव आहे. किडनी खराब किंवा निकामी झाली तर त्याचा शरीरावर प्रतिकूल परिणाम होतो; मात्र माणूस किडनीविना जिवंत राहू शकतो; मात्र त्यासाठी त्याला डायलिसिससारख्या उपचारपद्धतीवर अवलंबून राहावं लागतं. अशा स्थितीत किडनीविना माणूस किती काळ जिवंत राहू शकतो, असा प्रश्न उपस्थित होतो. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊ या.
बिहारमधल्या मुजफ्फरपूरमध्ये एक गंभीर प्रकरण नुकतंच उघडकीस आलं. तिथल्या एका बोगस डॉक्टरने एका महिला रुग्णाच्या शरीरातल्या दोन्ही किडनीज काढून घेतल्या आणि तो फरार झाला. सुनीता नावाच्या महिला रुग्णाच्या बाबतीत हा प्रकार घडला. गेल्या चार महिन्यांपासून सुनीता किडनीजविना जीवन जगत आहे. दर दोन दिवसांनी सुनीताला डायलिसिस घ्यावं लागत आहे. या उपचारपद्धतीमुळे ती अजूनही जिवंत आहे. खरं तर सुनीताच्या वैद्यकीय स्थितीचा आणि गंभीर प्रकरणाचा विचार करता, तिच्या पतीची किडनी तिला मॅच झाली नाही. ती सध्या मुजफ्फरपूरमधील एस. के. मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेत आहे. या ठिकाणी अनेक जण किडनी दान करण्यासाठी आले पण ती मॅच न झाल्याने सुनीताची किडनी ट्रान्स्प्लांट सर्जरी होऊ शकलेली नाही.
किडनी ट्रान्स्प्लांटसाठी दाता आणि रुग्ण यांचा रक्तगट जुळणं गरजेचं आहे. त्यानंतर दाता आणि रुग्णाच्या पेशी जुळवून पाहिल्या जातात. या दोन्ही गोष्टी जुळून आल्या तरच किडनी ट्रान्स्प्लांट केली जाते; मात्र ट्रान्स्प्लांटनंतर रुग्णाचं शरीर किडनी नाकारण्याची शक्यता असते. त्यामुळे रुग्णाला ट्रान्स्प्लांटनंतर एक वर्षापर्यंत नियमित तपासणी करावी लागते. ट्रान्स्प्लांटनंतर पहिले तीन महिने खूप नाजूक असतात. या कालावधीत रुग्णाचं शरीर किडनी नाकारण्याची शक्यता असते. कोणतीही समस्या न जाणवल्यास एक वर्षानंतर किडनी ट्रान्स्प्लांट यशस्वी झालं असं समजलं जातं. कारण या कालावधीनंतर किडनी रिजेक्ट होण्याची शक्यता केवळ दहा टक्के उरते. किडनी ट्रान्स्प्लांट केल्यानंतर रुग्णाला त्याच्या जीवनशैलीत बदल करावा लागतो. धूम्रपान सोडणं, वजन कमी करणं आणि योग्य आहार घेणं या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात.
किडनी नसणाऱ्या रुग्णाचं आयुष्य त्याचं शरीर डायलिसिस कशा पद्धतीने स्वीकारतं यावर अवलंबून असते. डायलिसिसच्या आधारे एखादी व्यक्ती अनेक वर्षापर्यंत जिवंत राहू शकते; मात्र यासाठी त्याला दर दोन दिवसांनी डायलिसिस घ्यावं लागतं. आज असे अनेक रुग्ण आहेत, जे किडनी मॅच होत नसल्याने ट्रान्स्प्लांटच्या प्रतीक्षेत डायलिसिसच्या आधारे जिवंत आहेत.
जगात असे अनेक नागरिक आहेत, जे एका किडनीवर जिवंत आहेत. आज तकच्या वृत्तानुसार ऑस्ट्रेलियातल्या किडनी हेल्थ ऑर्गनायझेशनने दिलेल्या माहितीनुसार, दर 750पैकी एक व्यक्ती एक किडनी घेऊन जन्माला येते. बऱ्याचदा एखाद्या गंभीर आजारामुळे संबंधित रुग्णाच्या दोनपैकी एक किडनी काढून टाकली जाते. अशा स्थितीत रुग्णाची एकच किडनी रक्त स्वच्छ करण्याचं काम करते; पण एखाद्या रुग्णाच्या दोनही किडन्या निकामी झाल्या आणि त्या काढून टाकल्या तर विनाकिडनी, उपचारांशिवाय असा रुग्ण जिवंत राहणं केवळ अशक्य आहे. किडनी आपल्या शरीरातलं रक्त स्वच्छ करते आणि हे कार्य बंद पडलं तर गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. एखाद्या व्यक्तीच्या दोन्ही किडन्या काढल्या तर ती व्यक्ती डायलिसिसविना जिवंत राहू शकत नाही. अशा व्यक्तीला आठवड्यातून तीन दिवस डायलिसिसची गरज भासते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.