बँकेच्या लॉकरमधील पैशांना लागली वाळवी, आता बँक म्हणते...
नवी दिल्ली: पैसे सुरक्षित राहावेत या उद्देशाने आपण ते बँक खात्यात ठेवतो. बँकादेखील ग्राहकांना सेव्हिंग्ज, करंट अकाउंट किंवा बचत योजनांसारख्या सुविधा पुरवतात. या शिवाय बहुतांश बँका आपल्या ग्राहकांना लॉकर सुविधा देतात. या साठी वेगळं शुल्क आकारलं जातं. या लॉकरमध्ये ग्राहक सोनं, चांदीसह अन्य मौल्यवान वस्तू आणि रक्कम ठेवू शकतात. ही सुविधा अत्यंत सुरक्षित मानली जाते. त्यामुळे अनेक लोक या सुविधेचा लाभ घेतात. मात्र आता लॉकर सुविधेचा लाभ घेण्यापूर्वी ग्राहकांनी पूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे.
तसेच संबंधित बँकेने लॉकर सुविधेशीसंबंधित मुलभूत नियमांचे पालन केलं आहे की नाही हेदेखील ग्राहकांनी तपासणं गरजेचं आहे. हे सर्व सांगण्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. उदयपूरमधील एका बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या नोटांना चक्क वाळवी लागली. यामुळे एका ग्राहकाचं मोठं नुकसान झालं आहे. विशेष म्हणजे ही बाब ग्राहकाने जेव्हा बँक कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली, तेव्हा त्यांनी जबाबदारी टाळली. एकीकडे नोटांचा भुगा झाला आणि दुसरीकडे बँकेने घेतलेल्या भूमिकेमुळे ग्राहकाला दुहेरी मनस्ताप सहन करावा लागला आहे. हा प्रकार नेमका काय आहे, ते जाणून घेऊया. ' आज तक`ने या विषयी वृत्त दिलं आहे.
राजस्थानमधील उदयपूर येथील पंजाब नॅशनल बँकेच्या एका महिला ग्राहकाने तिचा बँकेतील लॉकर उघडून पाहिला असता, त्यातील नोटांचा वाळवीने भुगा केल्याचे निदर्शनास आले आहे. हा प्रकार पाहून या महिलेला जबर धक्का बसला आहे. तिने बँकेच्या कर्मचाऱ्यांकडे या विषयी तक्रार केली; मात्र कर्मचाऱ्यांनी या प्रकाराची जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला. "बँकेच्या व्यवस्थापनाने पेस्ट कंट्रोल न केल्याने हा प्रकार घडला आहे. माझी सर्व रक्कम वाळवीने खाऊन फस्त केली आहे. यामुळे माझं मोठं नुकसान झालं आहे. रकमेव्यतिरिक्त मी लॉकरमध्ये अन्य काही सामान ठेवलं होतं. तेदेखील खराब झालं असावं, या प्रकरणी बँकेच्या व्यवस्थापनाकडं तक्रार केली आहे," असं पीडित महिलेनं सांगितलं. दरम्यान, बँकेतील 20 ते 25 लॉकर्समध्ये वाळवी असण्याची शक्यता आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी वेळेवर उपाययोजना केल्या असत्या तर लॉकरमध्ये ठेवलेल्या साहित्याला वाळवी लागली नसती. पण बँकेच्या कर्मचाऱ्यांनी उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याने लोकांचे नुकसान झाले आहे, असं बोललं जात आहे.
उदयपूरमधील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत हिरण मगरी येथील रहिवासी महेश मेहता यांची पत्नी सुनीता यांचा लॉकर आहे. त्यांना बँकेने 265 क्रमांकाचा लॉकर दिला आहे. या लॉकरमध्ये सुनीता यांनी 2.15 लाख रुपये ठेवले होते. गेल्या वर्षी मे महिन्यात त्यांनी लॉकर उघडून पाहिला असता, त्यातील सर्व रक्कम सुरक्षित होती. पण मागच्या गुरुवारी पैशाची गरज असल्याने त्या बँकेत आल्या आणि लॉकर उघडला असता समोरील दृश्य पाहून त्यांना जबर धक्का बसला. लॉकर उघडताच त्यातील सर्व नोटा वाळवीने खाऊन फस्त केल्याचे त्यांना दिसले.
लॉकरमध्ये नोटांचा भुगा शिल्लक होता. नोटांना वाळवी लागल्याचं पाहून सुनीता काहीशा घाबरल्या. त्यांनी तातडीने ही बाब बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. पण बँकेच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेची जबाबदारी टाळल्याचं दिसून आलं. "ग्राहकाच्या नुकसानाची महिती बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. समस्या दूर करण्यासाठी संबंधित ग्राहकाला पुन्हा बँकेच्या शाखेत बोलावलं आहे. बँकेच्या आतील भागाला ओल आली असल्याने वाळवीमुळे नुकसान झालं आहे," असं पंजाब नॅशनल बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक प्रवीण कुमार यादव यांनी सांगितलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.