भावपूर्ण श्रध्दांजली..
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. देवीसिंह शेखावत यांचे अल्पशा आजाराने पुणे येथील केईएम रुग्णालयात वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. ते भारतीय राजकारणी व शिक्षण तज्ञ होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य आणि १९८५ मध्ये अमरावती विधानसभा मतदारसंघातून विधीमंडळात भरघोस मतांनी निवडून आले होते. ते अमरावतीचे महापौर असतानाश्रीमती प्रतिभाताई पाटील (भारताच्या पहिल्या महिला राष्टपती) यांच्याशी विवाहबद्ध झाले होते. माजी आमदार राजेंद्र शेखावत हे त्यांचे सुपुत्र व ज्योती राठोड ही कन्या आहे.
डॉ. देवीसिंह रणसिंह शेखावत हे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या राज्यस्तरीय आंदोलन समितीचे अध्यक्ष असताना स्व. गोविंदभाई श्राॅफ यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी नागपूर अधिवेशनात संस्थाचालक व इतर संघटनांच्या वतीने भव्य मोर्चा काढला होता.थकीत वेतनेतर अनुदान व शिक्षण क्षेत्रात अनेक प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. सन २००४ ते २०११ या कालावधीत ते महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष होते.महामंडळाची चंद्रपूर आणि नाशिक अधिवेशने त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती.
त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील खासगी शिक्षण संस्थांचे प्रश्न सुटले आहेत.शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी खूप चांगले मार्गदर्शन केले होते. विद्या भारती शिक्षण संस्थेच्या विकासासाठी त्यांनी चांगले योगदान दिले होते. ते संस्थेच्या काॅलेजचे प्राचार्य म्हणून उत्तम काम केले होते.ते धर्मनिरपेक्ष पुरोगामी विचाराचे पुरस्कर्ते होते. डॉ. शेखावत यांच्या निधनाने महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ व शिक्षण क्षेत्रात न भरुन येणारे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील सर्व खासगी शिक्षण संस्थांच्या वतीने महामंडळ त्यांना विनम्र अभिवादन करून श्रध्दांजली अर्पण करीत आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती व सदगती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना.
रावसाहेब जिनगोंडा पाटील
कोषाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.