जागरूक पालक सुदृढ बालक अभियानात गुणवत्तापूर्ण आरोग्य तपासणी करा - प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख
सांगली : 'जागरुक पालक सदृढ बालक' अभियानात जिल्ह्यातील 7 लाख 50 हजार 298 बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करून कालबध्दरीतीने व गुणवत्तापूर्ण पद्धतीने आरोग्य तपासणी करून अभियान यशस्वीरीत्या पूर्ण करावे, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांनी दिल्या.
जागरूक पालक सुदृढ बालक जिल्हा कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. दीपा फिरके यांच्यासह आरोग्य विभागाचे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जागरूक पालक सुदृढ बालक अभियानात जिल्ह्यातील शून्य ते अठरा वर्षापर्यंतची सर्व बालकांची तपासणी करताना शाळाबाह्य मुले यातून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. या अभियानाची ग्रामस्तरापर्यंत व्यापक प्रचार व प्रसिद्धी करण्यात यावी. प्रचार व प्रसिद्धी साहित्यासह गावात दवंडी देऊनही प्रसिद्धी करावी, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिल्या.
डॉ. देशमुख म्हणाल्या, बालकांच्या तपासणीसाठी नेमलेल्या पथकाने त्यांना दिलेल्या उद्दिष्टानुसार काम केल्यास हे अभियान विहित कालावधीत पूर्ण होईल. आरोग्य विभागाने प्रत्येक आठवड्याला याचा आढावा घ्यावा. यासाठी नेमण्यात आलेल्या संनियंत्रण पथकाचे काम महत्त्वाचे आहे. तपासणी अभियानातून मुलांमध्ये आढळलेल्या दोषांवर वेळीच उपचार होऊन बालके सदृढ होतील हे या अभियानाचे फलित असेल. यासाठी बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी पालकांचे समुपदेशन करण्यासाठी शाळांमध्ये पालक सभा आयोजित करण्याबरोबरच तपासणीवेळी गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तपासणीचेही नियोजन करावे, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
जिल्ह्यातील शून्य ते अठरा वर्षापर्यंतची बालके तसेच किशोरवयीन मुला मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी 370 आरोग्य तपासणी पथके गठित करण्यात आली असून यामध्ये आर.बी.एस.के. 63 पथके, वैद्यकीय अधिकारी 35 पथके आणि समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या 272 पथकांचा समावेश आहे. शून्य ते सहा वर्षे वयोगटातील 1 लाख 15 हजार 333 मुले व 1 लाख 12 हजार 239 मुली आणि सहा ते अठरा वर्षे वयोगटातील 2 लाख 73 हजार 174 मुले व 2 लाख 49 हजार 552 मुलींची तपासणी करण्यात येणार आहे. हे तपासणी अभियान 60 दिवस ( 8 आठवडे) सुरू राहणार असून सरासरी 12 हजार 505 बालकांची प्रतिदिन तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये 8 हजार 895 ग्रामीण भागातील, 1 हजार 292 शहरी भागातील आणि 2 हजार 318 महापालिका क्षेत्रातील बालकांचा समावेश असेल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. माने यांनी बैठकीत दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.