अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल; भरतीपासून ट्रेनिंगपर्यंतचे निकष
भारतीय सैन्य दलातील भरती प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. अग्निवीर भरती प्रक्रिया आता नवीन निकषांवर होणार आहे. जुन्या प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आता अग्निवीर भरती प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये घेतली जाणार आहे. भारतीय सैन्य दलाने अग्निवीर भरतीसाठीच्या नवीन प्रक्रियेची जाहीरात जारी केली आहे. त्यानुसार आता अग्निवीर होण्यासाठी पहिल्या टप्प्यात सीईई-प्रवेश परीक्षा द्यावी लागेल.
अग्निवीर परीक्षा तीन टप्प्यांत होणार
अग्निवीर भरती प्रक्रिया आता तीन टप्प्यांमध्ये घेतली जाणार असून यामध्ये सीईई , शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणी घेण्यात येईल. या प्रक्रियेचा खर्च कमी व्हावा, या उद्देशाने भारतीय लष्कराने अग्निवीर भरती प्रक्रियेत हा बदल केला आहे. पहिल्या टप्प्यात सीईई-प्रवेश परीक्षा घेतली जाईल. दुसऱ्या टप्प्यात शारीरिक चाचणी आणि तिसऱ्या टप्प्यात वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. याबाबत लवकरच नवीन अधिसूचना जारी करण्यात येईल.
200 केंद्रांवर होईल CEE परीक्षा
अग्निवीरच्या नवीन भरती प्रक्रियेअंतर्गत, भरतीसाठी परीक्षा म्हणजेच, सामाईक प्रवेश परीक्षा ऑनलाईन घेण्यात येईल. या परीक्षेसाठी 60 मिनिटे म्हणजेच, एक तासाचा वेळ देण्यात येईल. यासाठी उमेदवारांना परीक्षा केंद्रावर जावं लागेल. एप्रिल 2023 मध्ये होणाऱ्या CEE साठी 200 परीक्षा केंद्रे असतील. परीक्षेनंतर गुणवत्ता यादी जारी केली जाईल. यासाठी अग्निवीर भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची फेब्रुवारी 2023 च्या मध्यापर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
परीक्षेनंतर शारीरिक चाचणी
CEE परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांची शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. दुसऱ्या टप्प्यांतर्गत होणाऱ्या शारीरिक चाचणीमध्ये महिला आणि पुरुष दोघांसाठीचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. महिला उमेदवारांना आठ मिनिटांत 1.6 चा रनिंग स्केल पार करावा लागेल. एवढेच नाहीतर 15 सिट-अपसह 10 सिट-अप पूर्ण करावे लागतील. तर, पुरुषांना 6:30 मिनिटांत 1.6 किमी धावावे लागेल, त्यानंतर 20 सिट-अप आणि 12 पुश-अप करावे लागतील. यामध्ये यशस्वी झालेल्या महिला आणि पुरुष उमेदवार तिसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी पात्र ठरतील.
शेवटच्या टप्प्यात वैद्यकीय चाचणी
पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी वैद्यकीय चाचणी ही शेवटची फेरी असेल. यामध्ये सैन्य दलाने घालून दिलेल्या नियमांनुसार, प्रकृती आणि शारीरिक तंदुरुस्ती योग्य असल्यास उमेदवारांना अग्निवीर बनण्याची संधी मिळेल.
काय होती जुनी भरती प्रक्रिया?
भारतीय सैन्यात अग्निवीर भरतीसाठी जुन्या प्रक्रियेत CEE ऐवजी प्रथम शारीरिक चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक होते. यानंतर वैद्यकीय चाचणी घेण्यात येई आणि शेवटच्या फेरीत CEE परीक्षा घेतली जायची. अग्निवीर सैन्य भरती प्रक्रियेवर उलटसुलट चर्चा झाली. गेल्या वर्षी भारतीय सैन्यात 40,000 अग्निवीरांची भरती करण्यात आली होती. सध्या त्यांचं प्रशिक्षण सुरू आहे. सुमारे 10 हजार अग्निवीरांना 4 वर्षांनंतर स्थायी कमिशन मिळणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.