मुख्यमंत्र्यांना आव्हान देण्यापेक्षा...,बच्चू कडूंचं आदित्य ठाकरेंना ओपन चॅलेंज
शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून निवडणूक लढवण्याचे चॅलेंज दिल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. 'तुम्हाला एवढीच हौस असेल तर शिंदे साहेबांच्या मतदारसंघात जाऊन तुम्ही लढा' असा सल्ला वजा टोला शिंदे गटाचे आमदार आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी लगावला आहे.
शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देऊन वरळी मतदारसंघातून लढावं असं आवाहन दिलं होतं, यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, 'असे आव्हान देणे हे पोचट झालंआहे. या आव्हानाला काही अर्थ नाही. हा बालिशपणा आहे जेव्हा विधानसभा निवडणूक होईल तेव्हा आव्हान दिले पाहिजे' असा टोला कडू यांनी आदित्य ठाकरेंना लगावला.
'तुम्हाला एवढीच हौस असेल तर शिंदे साहेबांच्या मतदारसंघात जाऊन तुम्ही लढा. तुम्ही माझ्या घरी या मी तुम्हाला दाखवून देईल याला काही अर्थ नसतो' असा सल्लाही बच्चू कडू यांनी दिली. दरम्यान,महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 27 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. येत्या 15 दिवसांमध्ये 10-15 आमदार फुटणार असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. 'सरकार फक्त बहुमतात नाही तर अतिबहुमतात आहे. 20-25 आमदार इकडे तिकडे झाले तरी सरकार मजबुतीने पूर्ण राहील. सरकार कार्यकाळ पूर्ण करेल', असा विश्वासही बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.
'इतर पक्षातले आमदार आहेत, त्यांचाही पक्षप्रवेश होऊ शकतो. मंत्रिमंडळ विस्तार होत नाही याचं कारण कोर्ट आणि पक्षप्रवेश आहे. 10 ते 15 आमदार पक्ष सोडणार आहेत. पक्ष कोणता हे सांगणार नाही. ठाकरे गटात आमदारच नाही राहिले, बाकीच्या पक्षातले आहेत. अधिवेशनाच्या आधी या आमदारांचा पक्ष प्रवेश होईल', असं बच्चू कडू म्हणाले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.