राष्ट्रपतींना भेटण्यासाठी ५ बेरोजगारांची १५०० किमी पायपीट..
नवी दिल्ली : एखादी मागणी लावून धरण्यासाठी किती पाठपुरावा करावा, किती त्रास सहन करावा, याचे उदाहरण आसाममधील पाच बेरोजगार युवकांनी घालून दिले आहे. आसाममधून मयूरभंज हे स्वतंत्र राज्य तयार करावे, ही मागणी प्रशासनाच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी थेट राष्ट्रपतींना साकडे घालण्याचे ठरवले आणि मग सुरू झाला त्यांचा १५०० किलोमीटरचा प्रवास. 'चलो दिल्ली' म्हणत त्यांनी ४७ दिवस पायी चालत राजधानी गाठली; परंतु येथे आल्यानंतर त्यांना ३ रात्री बसस्थानकावरच काढाव्या लागल्या, तेही कडाक्याच्या थंडीत!
रोज ३५ किमी पायपीट
'आम्ही सलग ४७ दिवस १५०० किलोमीटरहून अधिक चालत इथपर्यंत पोहोचलो आहोत. रोज किमान ३५ किमी चालायचो. जिथे जागा मिळेल तिथे रात्र काढायचो,' असे या बेरोजगारांतील सुकुलाल मरांडी यांनी सांगितले. विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा जन्म मयूरभंजमधील वरबेडा गावातील आहे.
राष्ट्रपती भेटत नाहीत तोपर्यंत जाणार नाही
'राष्ट्रपती भेटत नाहीत तोपर्यंत आम्ही परतणार नाही. मयूरभंजला वेगळ्या राज्याचा दर्जा मिळावा, अशी आमची मागणी आहे,' असा निर्धार सुकुलाल यांनी व्यक्त केला. सुकुलाल यांच्याबरोबर आलेले करुणाकर सोरेन सांगतात, 'आम्ही या बसथांब्यावर ३ दिवस आणि ३ रात्री कुडकुडत राहिलो आहोत. इंडिया गेटसमोर एक सार्वजनिक स्वच्छतागृह आहे, तिथे अंघोळ करत होतो.'
...आणि २ खोल्यांची व्यवस्था झाली
दिल्लीतील बडोदा बसस्थानकात सुकुलाल आणि त्याचे साथीदार रात्री १२ अंश सेल्सिअस तापमानात झोपले. १९ फेब्रुवारी रोजी मयूरभंज खासदारांच्या विश्रामगृहात त्यांना दोन खोल्या मिळाल्या. आम्हाला राष्ट्रपती भवनातून फोन आला. प्रोटोकॉलमुळे वेळ लागणार आहे, असे तरुणांनी सांगितले.
असा मिळाला ई-मेल
सुकुलाल म्हणतात, 'आम्ही हा प्रवास १ जानेवारीला सुरू केला. आम्ही २ फेब्रुवारीला राष्ट्रपतींना भेटण्यासाठी त्यांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर मेल पाठवला होता. प्रवासाला निघण्यापूर्वी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना कळवले होते. राष्ट्रपतींच्या भेटीचा उद्देशही सांगितला. त्यानंतर त्यांनी केंद्रीय आणि जिल्हा गुप्तचर विभागाला माहिती दिली. या विभागाच्या अधिकाऱ्याने आम्हाला राष्ट्रपतींचा ई-मेल पत्ता दिला. आम्ही सतत अधिकाऱ्याच्या संपर्कात होतो. आता इथपर्यंत पोहोचलो; परंतु आम्हाला बसथांब्यावर रात्र काढावी लागली. असे काही होईल असे वाटले नव्हते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.