'पतंजली'चे शेअर्स गडगडले!
मुंबई : योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली फूड्स कंपनीचा स्टॉक दिवसेंदिवस खाली येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या 1 आठवड्यापासून पतंजली फूडचे शेअर्स सातत्याने गडगडत आहेत. कंपनीत पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत सुमारे 7000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेअर्स आणखी खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना आणखी तोटा सहन करावा लागू शकतो.
दि. 3 फेब्रुवारी रोजी पतंजली फूड्सच्या शेअर्समध्ये लोअर सर्किट झाला. शेअर्स 903.35 च्या किंमतीपर्यंत खाली आणले होते. ट्रेडिंगच्या शेवटी, शेअरची किंमत 906.80 रुपये होती, जी 1 दिवसापूर्वीच्या तुलनेत 4.63 टक्क्यांनी घसरली आहे. त्याच वेळी, कंपनीचे बाजार भांडवल 32,825.69 कोटी रुपये आहे. 27 जानेवारीला शेअरची किंमत 1102 रुपयांच्या पातळीवर होती. बाजार भांडवल सुमारे 40,000 कोटी रुपयांच्या पातळीवर होते.
आठवडाभरात बाजार भांडवल 7000 कोटी रुपयांनी खाली आले आहे. ज्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. पतंजली फूड्सने 31 डिसेंबर 2022 रोजी तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने 15% वाढीसह 269 कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. तर 1 वर्षापूर्वीचा नफा 234 कोटी रुपये होता.
पतंजली फूडचा महसूल 26 टक्क्यांनी वाढून 7,929 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. 1 वर्षापूर्वी महसूल 6,280 कोटी रुपये होता. पतंजली फूड्सचे शेअर्स किती दिवस असेच राहतील हे सांगणे कठीण आहे. जसजसा शेअर बाजार खाली येत आहे. दिवसेंदिवस गुंतवणूकदारांची चिंताही वाढत आहे. मोठ्या संख्येने लोकांनी पतंजलीचे शेअर्स खरेदी केले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.