Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तुर्की-सीरियात मृतांचा आकडा 21000 पार..

तुर्की-सीरियात मृतांचा आकडा 21000 पार..


तुर्की आणि सीरियामध्ये विनाशकारी भूकंप झाला आहे. भूकंपामुळे आतापर्यंत सुमारे 21 हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासन मदत आणि बचावकार्यामध्ये गुंतलं आहे. अनेक भागांत अद्याप मदतीचं साहित्य पोहोचलेलं नाही. भारताने संकटात सापडलेल्या तुर्कीला मदतीचा हात दिला आहे. भारताने NDRF च्या तीन पथकांसह मदतीचं साहित्य तुर्कीमध्ये पाठवलं आहे. भारतीय बचाव पथकाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु आहे. NDRF ने गुरुवारी (9 फेब्रुवारी) सहा वर्षाच्या चिमुकलीचा जीव वाचवला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारतीय बचाव पथकाने वाचवला चिमुकलीचा जीव

भारतीय NDRF कडून श्वान पथकाच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. यादरम्यानचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. NDRF ने चिमुकलीला वाचवल्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत दिसत आहे. डॉक्टर चिमुकलीच्या आरोग्याची तपासणी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. बचाव पथक मुलीला अलगद स्ट्रेचरवर घेऊन जाताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

भूकंपातील मृतांचा आकडा 21000 पार

तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामध्ये मृतांची संख्या ही 21,000 च्या पुढे गेली आहे. हा गेल्या काही दशकातील सर्वात मोठा भूकंप आहे. आधी जपानमधील फुकूशिमा आपत्तीमधील मृतांचा आकडा मोठा होता. दरम्यान, तुर्की-सीरियातील भूकंपामुळे झालेल्या मृतांचा आकडा फुकूशिमामध्ये झालेल्या मृतांच्या संख्येपेक्षाही जास्त आहे. असोसिएट प्रेस या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.



तुर्कीसाठी भारताचं 'ऑपरेशन दोस्त'

भूकंपग्रस्त तुर्कीच्या मदतीसाठी भारताने मदतीचा हात दिला आहे. 'ऑपरेशन दोस्त'द्वारे भारत भूकंपग्रस्त भागात मदत पोहोचवत आहे. भूकंपग्रस्ताच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या तीन पथकांना विशेषत: श्वानपथक, वैद्यकीय आणि इतर आवश्यक उपकरणांसह भारतातून तुर्कीला पाठवण्यात आलं आहे. NDRF ची पथकं ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढताना दिसत आहेत. तुर्कस्तानमधील हताया येथे भारतीय लष्कराच्या फील्ड हॉस्पिटलमध्ये भूकंपामुळे प्रभावित झालेल्या लोकांना वैद्यकीय उपचार दिले जात आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.