कोल्हापुरात 12 वी पास कपाउंडरकडून गर्भलिंग निदान करून महिलांचा गर्भपात
कोल्हापूरमध्ये गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आल्यानंतर आतापर्यंत या प्रकरणात 18 संशयितांची नावे समोर आली असून यामधील 14 जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. गर्भलिंग निदान रॅकेटने अवघा जिल्हा पोखरला असून भुदरगड तालुक्यातून या प्रकरणाला वाचा फुटली होती. हा संपूर्ण प्रकार बोगस डाॅक्टर आणि त्यांच्या एजंटाकडून चालवला जात असल्याचे पोलिसांच्या तपासावरून दिसून येते.
गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणी राधानगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधानगरी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी बुधवारी रात्री बोगस डॉक्टर आणि एजंटला अटक केली. बोगस डॉक्टर विठ्ठल हिंदराव निकम (वय 39 रा. सावर्डे दुमाला, ता. करवीर) आणि एजंट संजय आप्पासो गोंधळी (वय 45 रा. सुळकूड ता. कागल) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात त्यांना हजर केले असता 28 फेब्रुवारीपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावनात सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यात एकूण 18 संशयतांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यापैकी 14 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आल्याची माहिती राधानगरी पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान या गुन्ह्यातील गजेंद्र उर्फ सनी बापूसो कुसाळे (रा. शिरसे, ता. राधानगरी) ओंकार कराळे (रा. सडोली, ता. करवीर) राजेंद्र यादव (रा. कारभारवाडी, ता. करवीर) आणि डॉक्टर प्रसाद ढेंगे (रा. मडिलगे बुद्रुक, ता. भुदरगड) हे चौघे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
12 वी पास कपाउंडरकडून गर्भलिंग निदान करून महिलांचा गर्भपात
दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार विठ्ठल निकमचे फक्त बारावीपर्यंत शिक्षण झाले असून त्याने एका ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये कंपाउंडर म्हणून काम केले होते. सध्या पन्हाळा तालुक्यातील एका गावात त्याचा दवाखाना सुरू होता. महिलांच्या घरी जाऊन तो गर्भलिंग चाचणी आणि गर्भपात घडवण्याचे काम तो करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक स्वाती गायकवाड यांनी दिली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापे टाकून राधानगरी आणि भुदरगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूणहत्या करणाऱ्या रॉकेटचा पर्दाफाश केला होता. त्यापैकी राधानगरी पोलिस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात एकूण 18 संशयतांची नावे निष्पन्न झाली आहेत. यातील 12 संशयतांना पोलिसांनी अटक केली आहे, तर बुधवारी रात्री विठ्ठल निकम आणि संजय गोंधळी या दोघांना अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एजंट गोंधळीने मिरज, कागल तालुक्यातील महिलांना गर्भलिंग चाचणीसाठी यापूर्वीच अटकेत असलेल्या श्रीमंत पाटीलकडे पाठविल्याचे तपासामध्ये समोर आले आहे. यासाठी त्याने किती रुपये घेतले यासह अन्य माहिती पुढील तपासात मिळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे आतापर्यंत किती गर्भपात या माध्यमातून झाले आहेत याची माहिती सुद्धा समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील अधिक तपासामध्ये आणखी धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.