ना OTP दिला, ना बारकोड स्कॅन केला; तरीही गमावले ५.७४ लाख
अमरावती: मोबाईलवर आलेला ओटीपी सांगितला, क्युआर कोडस्कॅन केला, अन बँक खात्यातील पैसे परस्पर उडाले, अशा फसवणुकीच्या घटना नवीन नाहीत. मात्र, येथील एका व्यावसायिकाच्या खात्यातून तब्बल ५ लाख ७४ हजार रुपये परस्पर डेबिट झाले. ना त्यांनी कुणाला ओटीपी पाठविला ना कुठला क्यु आर कोड स्कॅन केला. २३ नोव्हेंबर २०२२ रोजी घडलेल्या या ऑनलाईन फसवणकुीप्रकरणी सायबर पोलिसांनी दोन महिन्यानंतर २८ जानेवारी रोजी गुन्ह्याची नोंद केली. येथील जोशी कॉलनी स्थित डागा सफायरमध्ये राहणाऱ्या एका ५५ वर्षीय व्यावसायिकाचे तीन बँकेत खाती आहेत.
दरम्यान २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ च्या सुमारास झोपेतून उठल्याबरोबर त्यांना मोबाईलवर बँकेकडून आलेले संदेश दिसले. तिनही बँक खात्यातून ५ लाख ७४ हजार रुपये अनोळखी खात्यात ट्रान्सफर झाल्याचे ते संदेश पाहून ते नखशिखांत हादरले. विशेष म्हणजे त्यांना त्याबाबत कुणाचाही फोनकॉल आला नाही. त्यांनी कुणाला ओटीपी वा अन्य कुठलिही माहिती शेअर केली नाही. तरीदेखील अनोळखी आरोपीने त्यांची आर्थिक फसवणूक केली. याबाबत त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. लेखी तक्रार नोंदविली. सायबर पोलीस ठाण्याने पुरेसी खातरजमा केल्यानंतर २८ जानेवारी रोजी दुपारी दिडच्या सुमारास अनोळखी आरोपीविरूध्द फसवणूक व आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला.
पैसे स्विकारताना ओटीपी लागत नाही ओटीपी फक्त पैसे देताना लागतो. पैसे स्विकार करणाऱ्या माणसाला ओटीपीची गरज पडत नाही. अनेकदा नव्या यूजरला पाठवलेले पैसे स्विकारण्यासाठी ओटीपी लागतो, असं खोटं सांगूनही ओटीपी उकळला जातो. मात्र, जो यूजर पैसे पाठवणार आहे, फक्त त्याच्याच मोबाईल नंबरवर ओटीपी येतो, हे नेहमी लक्षात ठेवावे. सायबर करीत आहे सुक्ष्म तपास पैसे भरताना फक्त अधिकृत अॅप्स किंवा वेबसाइटचाच वापर करावा. वेबसाईट अथवा अॅप अधिकृत नसेल, तर ओटीपी ट्रॅक करून पैशाची चोरी केली जाते. ओटीपीशिवाय यूजरची खासगी माहितीही अश्या अॅप्समधून लिक होते. त्यामुळे डागा सफायरमधील त्या व्यावसायिकाची ऑनलाईन फसवणूक होण्यापुर्वी त्यांना काही मॅसेज आले का, त्यांनी कुठल्या लिंकवर क्लिक केले का, या अंगाने तपास केला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.