Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

“दररोजच्या ८ मिनिटांच्या कामासाठी मला ४० लाख रुपये पगार”, IAS अधिकारी अशोक खेमकांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

“दररोजच्या ८ मिनिटांच्या कामासाठी मला ४० लाख रुपये पगार”, IAS अधिकारी अशोक खेमकांचं मुख्यमंत्र्यांना पत्र


ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी (IAS) अशोक खेमका यांनी त्यांना दररोजच्या ८ मिनिटांच्या कामासाठी वर्षाला ४० लाख रुपये पगार मिळत असल्याचं खळबळजनक वक्तव्य केलं आहे. अशोक खेमकांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना पत्र लिहून आपली भावना कळवली आहे. तसेच हरियाणाच्या राज्य दक्षता विभागाचा प्रमुख म्हणून नियुक्ती मिळावी, अशी मागणी केली.

अशोक खेमका यांनी २३ जानेवारीला हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना पत्र लिहिले. खेमकांच्या या पत्रावर मुख्यमंत्री कार्यालयाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. खेमका यांची ९ जानेवारी २०२३ पासून हरियाणाच्या अभिलेख विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली आहे. मात्र, या ठिकाणी करण्यासारखं फार काही कामच नसल्याचं खेमका यांनी म्हटलंय.“दररोजच्या जेमतेम ८ मिनिटांच्या कामासाठी मला ४० लाख रुपये पगार”

खेमका आपल्या पत्रात म्हणाले, “अभिलेख विभागात मला एका दिवसात जेमतेम ८ मिनिटे काम आहे. त्यासाठी मला वर्षाला ४० लाख रुपये पगार मिळतो आहे. पी. के. चिन्नास्वामी विरुद्ध तामिळनाडू आणि इतर या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने १९८७ ला दिलेल्या निकालात प्रत्येक अधिकाऱ्याला त्याच्या पदानुसार नियुक्ती आणि काम दिले पाहिजे, असं मत नोंदवलं आहे.”

“विभागाचं बजेटच्या १० टक्के माझा पगारच”

“९ जानेवारी २०२३ रोजीच्या आदेशानुसार माझ्याकडे अभिलेख विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या विभागाचे वार्षिक बजेट ४ कोटी रुपये आहे. ही रक्कम राज्याच्या एकूण अर्थसंकल्पाच्या ०.००२५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यात मला येथे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून वर्षाला ४० लाख रुपये वेतन दिले जाते. हे प्रमाण विभागाच्या एकूण बजेटच्या १० टक्के आहे,” असं मत अशोक खेमका यांनी व्यक्त केलं.

“एकतर्फी कामाच्या वितरणाने सार्वजनिक हित साधलं जाणार नाही”

“अभिलेख विभागात मला आठवड्यातून केवळ एक तासाचं काम आहे. दुसरीकडे इतर विभागांमध्ये काही अधिकार्‍यांवर अधिकच्या कामाचा भार आहे. अशा एकतर्फी कामाच्या वितरणाने सार्वजनिक हित साधलं जाणार नाही. प्रत्येक अधिकाऱ्याची सचोटी, योग्यता आणि बुद्धीमत्ता लक्षात घेऊन काम दिलं पाहिजे,” अशी मागणी खेमकांनी केली.

“सेवेतील अखेरच्या काळात दक्षता विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती द्या”

अशोक खेमका पुढे म्हणाले, “सगळीकडे भ्रष्टाचार आहे हे तुम्हाला माहिती आहे. मला जेव्हा भ्रष्टाचार दिसतो तेव्हा खूप त्रास होतो. भ्रष्टाचाराचा हा कर्करोग संपवण्यासाठी मी माझं करिअर पणाला लावलं आहे. भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सरकारचा दक्षता विभाग काम करतो. त्यामुळे माझ्या सेवेतील अखेरच्या काळात मला या दक्षता विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती द्यावी. मला ही संधी मिळाल्यास कोणी कितीही मोठा व्यक्ती असला तरी त्याच्यावर कारवाई करेन, याची खात्री देतो.”

मुख्यमंत्री खट्टर आणि मंत्री अनिल विज यांच्याकडून खेमकांचं कौतुक

मागील वर्षी हरियाणाचे कॅबिनेट मंत्री अनिल विज यांनी खेमका “दुर्मिळ प्रकारचे अधिकारी” आणि “रत्न” असल्याचं कौतुक केलं होतं. तसेच असे अधिकारी ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत क्वचितच पाहिल्याचंही त्यांनी म्हटलं. त्यावर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनीही सहमती दाखवली. इतकंच नाही तर या दोघांनीही नुकत्याच झालेल्या अधिकाऱ्यांच्या मूल्यांकन अहवालात खेमकांना १० पैकी ९.९ गुण दिले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.