Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरजेतील कारभारी झाले मॅनेज?

मिरजेतील कारभारी झाले मॅनेज?


मिरज : मिरजेत मध्यरात्री हॉटेल, दुकाने, घरे जेसीबीच्या सहाय्याने उध्वस्त करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी काही स्थानिक नेत्यांनी हे कृत्य बेकायदेशीर असल्याच्या प्रतिक्रिया माध्यमांसमोर दिल्या. मात्र डोक्यावरचे छप्पर उडून गेलेल्यांच्या मदतीला मिरजेतील एकही कारभारी पुढे आला नाही. रविवारच्या मिरज बंदलाही संमिश्र प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मिरजेला कोणी वाली आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय आपापले वॉर्ड सांभाळणारे कारभारी या प्रकरणात मॅनेज झाले का? असाही प्रश पिडीत कुटुंबातील लोकांकडून विचारला जात आहे.

मिरजेतील बसस्थानक परिसरातील हॉटेल, गाळे, दुकाने, घरं मध्यरात्री उध्वस्त करण्यात आली. त्यामुळे अनेक कुटुंब अर्ध्या रात्री रस्त्यावर आली. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनीच ही बांधकामे उध्वस्त केल्याचा आरोप केला जात आहे. त्यावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी कारवाई महापालिकेच्या नोटीसीनंतर करण्यात आल्याचे म्हटले आहे. शिवाय ती जागा ब्रह्मानंद पडळकर यांनी काही वर्षांपूर्वी विकत घेतल्याचे सांगितले जात आहे. शिवाय दुसरीकडे महापालिकेनेच अतिक्रमण हटवल्याचेही काहींचे म्हणणे आहे. कोणाचे काहीही म्हणणे असली तरी अनेक कुटुंबे मध्यरात्री रस्त्यावर आली आहेत. त्यांच्या बाजूने मिरजेतील एकही कारभारी पुढे येण्यास तयार नाही...

मिरजेतील सत्ता अबाधित ठेवून महापालिकेत वर्चस्व गाजवणारे हे कारभारी काय करत आहेत असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. फक्त स्वतः स्वतःची मुले, कुटुंबातील सदस्य यांचे वॉर्ड सुरक्षित ठेवण्यासाठीच मिरजेचे ठराविक कारभारी काम करत आहेत का? असा प्रश्नही पीडित कुटुंबाकडून विचारला जात आहे. याआधीही मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता रुंदीकरण करताना आंदोलने झाली आहेत. त्यात ठराविक लोकांनाच टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळीही मिरजेतील कारभारी मूग गिळून गप्प का बसले होते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


मिरजेत मध्यरात्री झालेली इमारतींची पाडापाड पूर्वनियोजित होती असाही आरोप पीडित कुटुंबातील लोकांकडून केला जात आहे. त्याची कल्पना कारभारी, महापालिकेतील अधिकारी, पोलिस प्रशासन यांना नव्हती यावर विश्वास बसत नसल्याचेही पीडितांचे म्हणणे. कायदेशीर सोपस्कार पूर्ण करूनच हे कृत्य केल्याचे समर्थन संबंधित लोक करत आहेत.

मात्र राज्यातील एका 'वजन' दार नेत्याने

प्रशासनाला गप्प राहण्याचे आदेश दिल्याची चर्चा आहे. शिवाय कारभारी आणि प्रशासनातील काही लोकांच्या कागदावर भरभक्कम वजन ठेवल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे मिरजेला आता कोणी वालीच राहिला नसल्याचे मिरजकरांचे म्हणणे आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.