Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ओडिशाच्या आरोग्यमंत्र्यांचा पोलिसाच्या गोळीबारात मृत्यू

ओडिशाच्या आरोग्यमंत्र्यांचा पोलिसाच्या गोळीबारात मृत्यू


विमानाने भुवनेश्वरला हलविले, पण वाचू शकले नाहीत प्राण

भुवनेश्वर : ओडिशाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री नब किशोर दास यांच्यावर रविवारी ओडिशाच्या झारसुगुडा येथील ब्रजराजनगरमध्ये सहायक पोलिस उपनिरीक्षक गोपालकृष्ण दास (एएसआय) याने गोळ्या झाडल्या. मंत्री दास यांना प्रथम जिल्हा रुग्णालयात आणि नंतर विमानाने भुवनेश्वरला हलविण्यात आले. परंतु अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना रात्री त्यांचा मृत्यू झाला. गोळीबार करणाऱ्या उपनिरीक्षकास पकडले आहे.

डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. एकच गोळी शरीरात घुसली होती. आरोपी दास बायपोलर डिस्ऑर्डरने ग्रस्त आहे. त्याला सहज राग यायचा आणि त्यासाठी त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याने माझी शेवटची भेट घेऊन एक वर्ष झाले आहे, असे एमकेसीजी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे डॉ. चंद्रशेखर त्रिपाठी यांनी पत्रकारांना सांगितले.

नेमके काय झाले...

ब्रजराजनगरमधील गांधी चौकाजवळ ही घटना घडली. एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते कारमधून उतरले असताना त्यांचे समर्थक त्यांना पुष्पहार घालत होते. याचवेळी हा गोळीबार झाला. या घटनेनंतर मंत्री लगेचच कोसळले. एक स्थानिक तरुण आणि एक पोलिस अधिकारीही गोळीबारात जखमी झाला.

दास शनी शिंगणापूरला द्यायचे देणगी

अहमदनगर : ओडिशाचे आरोग्यमंत्री नब दास यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे शनी शिंगणापूरवर शोककळा पसरली. नब दास हे नेहमीच शनी शिंगणापूरला यायचे. ते मोठी देणगीही देवस्थानला द्यायचे. मात्र, ही देणगी आपण धार्मिक भावतेून देत आहोत. त्यामुळे त्याची कुठेच प्रसिद्धी करू नका, असे ते देवस्थानला सांगायचे. गत महिन्यात २१ जानेवारीला शनी अमावास्येच्या (पौष अमावास्या) दिवशी त्यांनी सहकुटुंब शनिदर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवस्थानला मोठी देणगी दिली होती. मात्र, याही वेळी त्यांनी देणगी दिल्याची प्रसिद्धी करू नका, असे त्यांनी सांगितले होते. शनी अमावास्येच्या दिवशीचे त्यांचे हे शनिदर्शन अखेरचे ठरले. या घटनेने मला धक्का बसला आहे. या हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

- नवीन पटनायक, मुख्यमंत्री, ओडिशा

महाविद्यालयीन जीवनापासून राजकारणात कायद्याचे पदवीधर असलेले नब किशोर दास (वय ६०) महाविद्यालयीन काळापासून राजकारणात होते. पश्चिम ओडिशातील सर्वांत जुन्या महाविद्यालयांपैकी एक असलेल्या संबलपूर येथील गंगाधर मेहेर महाविद्यालयात विद्यार्थी संघाचे ते अध्यक्ष राहिले होते. ओडिशात एनएसयूआयचे आणि यूथ काँग्रेसचे ते नंतर उपाध्यक्ष बनले. पटनायक यांच्या मंत्रिमंडळातील ते सर्वांत श्रीमंत सदस्यांपैकी एक होते. कोरोना काळात त्यांनी कौतुकास्पद काम केले होते. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे जवळचे विश्वासू मानले जाणारे दास यांनी २९ मे २०१९ रोजी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री म्हणून शपथ घेतली. दास यांच्या पश्चात पत्नी मिनाती दास आणि मुलगा, मुलगी असा परिवार आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.