खासदार संजय पाटील; रांजणीत ड्रायपोर्ट होणारच..
सांगली, ता. २९ : "राजणी (ता. कवठेमहांकाळ) येथे ड्रायपोर्टसाठी राज्य शासनाकडून जागा हस्तांतरण होणे बाकी आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना हे काम थांबले होते.. ते लवकर पूर्ण करून ट्रायपोर्टचे काम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ड्रायपोर्टची मागणी झाली असली तरी तो त्यांचा विषय आहे. त्याचा रांजणीच्या प्रकल्पावर परिणाम होणार नाही. रांजणीत ड्रायपोर्ट होणारच," असा विश्वास खासदार संजय पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
हातकणंगले मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने यांनी शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे ड्रायपोर्टची मागणी केली. त्या मागणीला श्री. गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने रांजणीतील ड्रायपोर्टबाबत चर्चा सुरू झाल्या. त्याबाबत खासदार पाटील म्हणाले, "रांजणीतील ड्रायपोर्टला वेळ लागतोय, याची खंत आहे. परंतु, हा ड्रायपोर्ट शंभर टक्के होणार आहे. कोल्हापूरकरांनी काय मागावे, हा आपला विषय नाही. त्याचा परिणाम रांजणीतील ड्रायपोर्टवर होण्याचा संबंधच नाही.
येथे ड्रायपोर्ट होणे तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे. कारण, जिल्ह्यातून द्राक्ष, बेदाणा, डाळिंब, साखर निर्यात मोठ्या प्रमाणात होते. शेजारील कर्नाटक राज्यातही द्राक्ष, बेदाणा शेतीचा विकास झाला आहे. त्यामुळे येथे ड्रायपोर्ट फायद्याचे आहे. या जागेचा संपूर्ण सर्व्हे झाला आहे. अधिकारी पातळीवर चर्चा सुरू आहेत. श्री. गडकरी यांना ड्रायपोर्टवर अत्याधुनिक पद्धतीचे रस्ते करण्याची ग्वाही दिली आहे, जेणेकरून तेथे विमानही उतरू शकेल. "
सांगलीला महामार्गावर आणू
खासदार पाटील म्हणाले, "सांगली शहर महामार्गावर यावे, यासाठीचे नियोजन सुरू आहे. पेठ-सांगली रस्त्याचे काम पुढे महिन्यात सुरू होईल. तो रस्ता पुढे कुपवाड, कवलापूरलगत पासून तानंग फाटा येथे जोडला जावा, असा प्रयत्न आहे, जेणेकरून हा रस्ता कवलापूर विमानतळाजवळून जाईल, अशी अपेक्षा आहे. पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासोबत यावर प्राथमिक चर्चा झाली आहे."
महामार्गाबाबत नियोजन
जिल्ह्यातून जाणाऱ्या नवीन महामार्गांची जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याशी 'कनेक्टिव्हिटी' व्हावी आणि त्याचा विकासाला फायदा व्हावा, अशी अपेक्षा खासदार पाटील यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, “सांगली-कोल्हापूर रस्त्याचे संपूर्ण काँक्रिटीकरण करण्यास श्री. गडकरी यांनी मान्यता दिली आहे.
हा ८६० कोटींचा ३२ किलोमीटर रस्ता आहे. पुणे-बंगळूर हरित महामार्गाची विटा, तासगाव शहरांना कनेक्टिव्हिटी व्हावी, यासाठी आग्रही आहे. सोबतच सलगरे येथून ड्रायपोर्टसाठी या रस्त्याची 'कनेक्टिव्हिटी' करण्याबाबत मागणी केली आहे. याशिवाय, भिलवडी -विटा रस्त्यासाठीच्या जमीन अधिग्रहण भरपाईची रक्कम मिळावी, यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. "
खासदार पाटील म्हणाले, “महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या शक्तिपीठ महामार्गाचा जिल्ह्याला अधिकाधिक फायदा व्हावा, असा प्रयत्न आहे. हा महामार्ग मंगळवेढ्यातून निघून जतमार्गे पुन्हा नागज येथे रत्नागिरी-नागपूर महामार्गाला जोडावा, असा प्रस्ताव मांडला आहे."
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.