Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हळ्दी - कुंकू .

हळ्दी - कुंकू .


हळदी-कुंकू म्हणजे पती नसलेल्या महिलांना अपमानीत करण्याचा सण बरोबर ना एकदा विचार करा स्वताची बहिण मुलगी असेल तर!? हळदी-कुंकू या विषयावर लेख लिहिताना काही महिला माझ्यावर नाराज होणार हे अपेक्षित आहे.कोणाला बरं वाटावं कोणी मला चांगलं म्हणावं म्हणून लिखाण करण्याऐवजी अनिष्ट रूढी-परंपरा नष्ट करण्यासाठी,, ज्या सणामध्ये पती मयत झालेली स्त्री, शहीद जवानाची वीर पत्नी यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळत नसेल ते सण मला मान्य नाहीत. त्या सणाचे मी आजही समर्थन करत नाही, या पुढेही करणार नाही.

संक्रांतीनंतर हळदी-कुंकू कार्यक्रम घरोघरी गल्ली-बोळात दिसतात.हळदी-कुंकू सण म्हणजे नवरा असणाऱ्या बायका नटून-थटून एकमेकींना हळदी-कुंकू लावतात व भेटवस्तू देतात. हे हळदी-कुंकू त्याच स्त्रियां लावतात ज्यांचे पती जिवंत असतात. या महिलांना सवाष्णी असे म्हणतात. देशाच्या सीमेवर शहीद झालेल्या वीर पत्नीला‌ सन्मानपूर्वक या कार्यक्रमात वागणूक दिलेली मी कधी पाहिले नाही. जेव्हा तुम्ही नटून-थटून हळदी-कुंकू संभारंभात जाता तेव्हा ज्या महिलांचे पती जिवंत नाहीत, ज्यांना त्यांच्या पतीने सोडून दिले आहे त्यांच्या मनात काय कालवाकालव होत असेल

फक्त महिला बोलतात एका स्त्रीचे मन फक्त एक स्त्रीच जाणू शकते. परंतु कधी पती नसलेल्या महिलांचे हळदी-कुंकू या विषयावर मन जाणून घेण्याचा कोणा महिलेनं प्रयत्न केला का ? हळदी-कुंकू समारंभात अशा महिलांना हेतूपुरस्कर अपमानीत केलं जातं का ? या महिलांना सन्मानाची वागणूक देणारा सण असू शकत नाही का ? कोणत्याही शुभ कार्यात या महिलांना पुढे येऊन देत नाहीत. चुकूनमाकून ती त्या कार्यक्रमात पुढे आली तर तिच्यावर रागावलं जातं. तिनं असं अपमानीत जीवन का जगायचं ?

“नवरा असणे" हाच केंद्रबिंदू मानून आपण स्त्रियांचं मूल्यमापन करणार का ? खरं तर जास्तीत भावनीक गरज समाजात एकटं पडलेल्या स्त्रियांना असते. समाजाने त्यांना समजाऊन घ्यायला हवं. जेव्हा पुरुष अर्ध्यावर संसार टाकून जातो तेव्हा ती पदर खोचून जीवनसंघर्षात उतरते, चिल्ल्यापिल्ल्यांना सांभाळते. अशा महिलांना अपमानीत करणारे असे सण उत्सव हवेतच कशाला?

सर्व महिलांना सन्मानपूर्वक सहभागी करुन घेणारे सण-उत्सव आपण कधी निर्माण करणार ?

म्हणून पती नसलेल्या स्त्रियांना अपमानीत करणारे सण, उत्सव, प्रथा आपण अजून किती काळ चालू ठेवायच्या , यांवर विचार झाला पाहिजे. कर्मकांडाच्या आणि धार्मिक श्रध्दांच्या नावाखाली असे सरळ सरळ 'विषमतेला' खतपाणी घालणारे रिवाज किती काळ पाळायचे ? पाया पडणाऱ्या स्त्रीला फक्त 'अष्टपुत्र सौभाग्यवती भव’ असा आशीर्वाद देणे, ही तिच्या आत्मसन्मानाची कुचेष्टाच आहे. तथापि, जोपर्यंत हे स्त्रियांना समजत नाही, तोपर्यंत त्या अशा संस्कृतीच्या गुलामगिरीतच राहणार !

मग वर्षानुवर्षे चालत आलेल्या मानसिक गुलामगिरीचं काय ? परंपरांच्या नावाखाली चालत असलेल्या सांस्कृतिक गुलामगिरीचं काय ? आपण समतावादी असूनही मूग गिळून गप्प बसणार का ? तसं असेल तर आपलं हे वागणं सुसंस्कृत म्हणायचं की संधिसाधू ? शिक्षित स्त्री-पुरुष आपला परिवार, समाज यांस अनिष्ट रूढी, परंपरा, यातून मुक्त करु शकत नसतील तर त्या शिक्षणाचा काय उपयोग.? शिक्षण म्हणजे काय तर जे घेतल्यानंतर चांगलं वाईट यातील फरक समजतो व वाईट कृतीला विरोध करण्याची शिकवण मिळते ! म्हणूनच, आता आपण बदलायला हव. तिला ही सन्मानपूर्वक जगण्याचा अवकाश मोकळ्या मनाने द्यायला हवा..!!

बघा विचार करा पटतंय का..!?

जिजाऊ ब्रिगेड  - कोशाध्यक्ष 

शिवमती ज्योती नितिन चव्हाण.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.