सुप्रिया सुळेंची हिंदू जन आक्रोश मोर्चावर खोचक प्रतिक्रिया
म्हणाल्या, "'लव्ह'चा अर्थ कळतो, 'जिहाद'चा."
पुणे : सकल हिंदू समाजाकडून मुंबईत हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. अनेक हिंदुत्ववादी संघटना या मोर्चात सहभागी झाल्या आहेत. लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याच्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात भाजपच्या नेत्यांसह शिंदे गटाचे नेते सामील झाले आहेत. या मोर्चात मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र, या मोर्चाची खिल्ली उडवली आहे.
लव्ह जिहादचा अर्थ मला माहीत नाही. 'लव्ह'चा अर्थ मला कळतो. 'जिहाद'चा अर्थ मला कळत नाही, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी या मोर्चावर प्रतिक्रिया दिलीय. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी संतोष बांगर प्रकरणावर प्रतिक्रिया देताना केंद्र सरकारवर देखील सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, "आमदार संतोष बांगर यांनी प्राचार्यांना केलेली मारहाण दुर्दैवी आहे. सत्तेत आल्यापासून ईडी सरकार हे प्रशासनात कमी आणि चुकीचेच कामे अधिक करत आहेत. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीत न बसणारे आहे. मला वाटत ईडी सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे ऐकत नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात, मी देशाचा प्रधान सेवक आहे. याचा विसर ईडी सरकारला आहे. त्यामुळे ईडी सरकारकडून केवळ सुडाचे राजकारण सुरू आहे." वंचित आघाडीच्या युतीवर त्यांनी भाष्य करणं टाळलं. "या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सविस्तर बोलले आहेत. त्यामुळे मी काही बोलणे उचित होणार नाही. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते भेटतील तेव्हा यावर बोलतील. महाविकास आघाडीसमोर अजून वंचितचा प्रस्तावच आलेला नाही", असं त्या म्हणाल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.