Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दि. ९ जानेवारीचा सांगली येथील सकल जैन समाजाचा मोर्चा तूर्त स्थगित

दि. ९ जानेवारीचा सांगली येथील सकल जैन समाजाचा मोर्चा तूर्त स्थगित


सांगली (दि. ६) : श्री सिध्दक्षेत्र सम्मेद शिखरजी क्षेत्रास पर्यटन स्थळ जाहीर केल्याच्या निषेधार्थ जैन समाजाच्या भावना दुखावल्याने त्याच्या निषेधार्थ जैन समाजाने मूकमोर्चा आयोजित करून देशभर विरोध दर्शविला. काल दि. ५ जानेवारी २०२३ रोजी अखिल भारतीय तीर्थक्षेत्र रक्षा कमिटीचे अध्यक्ष श्री शिखरचंद पहाडीया जनरल सेक्रेटरी संतोष जैन पेंढारी, अशोकजी पाटणी व विविध जैन पंथांच्या प्रतिनिधींनी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री नामदार श्री. भूपेंद्र यादव यांनी दिल्ली येथे आयोजित केलेल्या बैठकीत जैन समाजाची भूमिका त्यांच्यासमोर मांडली. चर्चेअंती पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने एक कार्यालयीन सूचना प्रसिद्ध केली आहे, त्यामध्ये सम्मेद शिखरजी पर्वताचे पावित्र्य व त्याचे महत्त्व मान्य करून ते कधीही धोक्यात येणार नाही यासाठी कटिबद्ध असल्याचे नमूद केले आहे. 

तसेच पारसनाथ पर्वतावर मद्यपान, मांसाहार खाद्यपदार्थ, ड्रग्ज व नशापान संबंधित पदार्थांची विक्री व पर्यावरणाला हानीकारक कोणत्याही गोष्टी करण्यास पूर्णपणे प्रतिबंध राहील तसेच तेथील नैसर्गिक शांती भंग करणाऱ्या कोणत्याही कृतीस परवानगी राहणार नाही. त्याचबरोबर पर्यावरणीयदृष्ट्या शिखरजी क्षेत्रावर आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी झारखंड सरकारला समिती नेमण्याची सूचना करण्यात आली आहे. झारखंड सरकारने या क्षेत्राचे पावित्र्य अबाधित राहण्यासाठी कटीबद्ध असल्याचे केंद्र सरकारला पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. सदर क्षेत्रावरील पर्यावरणीय विकासासंबंधी समिती गठीत करण्याची प्रक्रिया सुरू आहे असेही नमूद केले आहे. शिखरजीचे पावित्र्य संरक्षणासाठी गिरीडीह जिल्हाधिकारी यांना राज्यसरकारने निर्देश देवून त्याठिकाणी पोलिस बंदोबस्तात वाढ केल्याचे नमूद केले आहे.

वरील सर्व बाबी विचारात घेवून देशभरातील आयोजित होणारे मूकमोर्चेतूर्तात स्थगित करण्याचा निर्णय देशपातळीवरील सकल जैन समाजाने घेतला आहे. त्यानुसार प.पू. १०८ आचार्यश्री चंद्रपभूसागरजी महाराज, प.पू. १०८ मुनिश्री नियमसागरजी महाराज, जगद्गुरू भट्टारक जिनसेन महास्वामीजी, नांदणी व अभिनव भट्टारक लक्ष्मीसेन महास्वामीजी, कोल्हापूर यांचे यासंबंधी मार्गदर्शन व आशीर्वाद घेवून सांगली येथे ९ जानेवारी रोजी होणारा मोर्चा सकल जैन समाजाने तूर्त स्थगित केल्याची माहिती यावेळी देण्यात आली आणि दि. २ ऑगस्ट २०१९ ची अधिसूचना रद्द करून शिखरजी पवित्र सिध्दक्षेत्र म्हणून घोषित करण्याची अधिसूचना प्रसिद्ध करावी अशी मागणी करण्यात आली.

दक्षिण भारत जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, चेअरमन श्री. रावसाहेब पाटील, भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश आ. पाटील, जैनाचार्य विद्यासागर सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुहास पाटील, जैन श्वेतांबर पार्श्वनाथ देहरासह ट्रस्ट अध्यक्ष सुभाषभाई शहा, जैन श्वेतांबर स्थानकवासी जैन संघाचे अध्यक्ष अरुणभाई सेठ, सभेचे ट्रस्टी शांतिनाथ नंदगावे, महामंत्री प्रा. एन. डी. बिरनाळे, महिला महामंत्री सौ. कमल मिणचे, प्रविण वाडकर, आदि मान्यवर उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.